मुंबई : भारतीय शास्त्रीय नृत्यक्षेत्रात आचार्य पार्वतीकुमार यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. आचार्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत, त्यांच्या शिष्या नृत्यगुरू डॉ.संध्या पुरेचा आणि त्यांच्यासोबत दीड हजार कलाकार वर्षभर शास्त्रीय नृत्यांचे १०० कार्यक्रम करणार आहेत.केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देश आणि परदेशातही वर्षभर या कार्यक्रमांचे १०० प्रयोग करण्याची तयारी सरफोजीराजे भोसले केंद्राने केली आहे. या निमित्ताने दीड हजारांहून अधिक कलाकार शास्त्रीय नृत्याचा आविष्कार घडविणार आहेत. राज्यभरात २०, उर्वरित देशभरात ७० आणि युरोप, अमेरिकेत १० प्रयोग करण्याचा संकल्प या संस्थेने केला आहे.या अंतर्गत, २७ फेब्रुवारी, २०२० ते फेब्रुवारी २०२१ या वर्षात आचार्य पार्वतीकुमार जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारीपासून पुढील चार दिवसांत नेहरू सेंटर, रवींद्र नाट्यमंदिर, भरत कॉलेज सेंटर येथे सलग नऊ कार्यक्रम होणार आहेत. १ मार्च रोजी ‘ऋतुचक्र’ आणि ‘चित्रसूत्र’ हे दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमांना रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.‘ऋतुचक्र’ हा कार्यक्रम महाकवी कालिदासांच्या काव्यावर आधारित आहे. सदानंद डबीर यांनी त्याचे लेखन केले असून, आशा खाडीलकर यांनी या कार्यक्रमाला संगीत दिले आहे. डॉ. संध्या पुरेचा यांच्या नृत्यदिग्दर्शनात नेहरू सेंटरच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.‘चित्रसूत्र’ या कार्यक्रमात प्रथमच शास्त्रीय नृत्याबरोबर काव्य, नाट्य, चित्रकला यांचा एकत्रित आविष्कार रंगणार आहे. या नऊ सत्रांत डॉ. संध्या पुरेचा, पुरू दधीच, विभा दधीच यांचे नृत्याविष्कार, दामिनी नाईक यांचे अरंगेत्रम आदी कार्यक्रम आहेत. सुनील कोठारी, दर्शना झवेरी, सुनयना हजारीलाल, पद्मा शर्मा या ज्येष्ठांचा सहभाग आणि जुन्या-नव्या कलाकारांचा संगम हे या कार्यक्रमांचे वैशिष्ट्य आहे.
वर्षभर रंगणार शास्त्रीय नृत्यांचे १०० कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 1:34 AM