हवाई प्रवाशांना पुरविलेल्या सुविधांपोटी ४ कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 02:51 AM2019-08-10T02:51:11+5:302019-08-10T02:51:22+5:30
७५० तक्रारींपैकी १२४ तक्रारी प्रलंबित
- खलील गिरकर
मुंबई : जून, २०१९ मध्ये हवाई प्रवासात उड्डाणाला विलंब, विमानाचे उड्डाण रद्द, विमानात प्रवेशाला मनाई अशा विविध प्रकारांमध्ये २ लाख ३२ हजार ६९९ प्रवाशांना पुरविलेल्या सुविधांपोटी ४ कोटी २१ लाख ८२१ हजार रुपये खर्च केले. हवाई प्रवासातील त्रुटींबाबत महिन्याभरात ७५० प्रवाशांनी तक्रारी नोंदविल्या. त्यापैकी ६२६ तक्रारींचे निरसन झाले, तर १२४ तक्रारी प्रलंबित आहेत.
७५० तक्रारींपैकी सर्वात जास्त २७८ तक्रारी एअर इंडियाच्या सेवेबाबत आहेत. इंडिगोच्या सेवेबाबत २७५ तक्रारी आल्या आहेत. स्पाइसजेटबाबत ११४ तक्रारी, गो एअर बाबत ६० तक्रारी, एअर एशिया व विस्ताराच्या प्रत्येकी १०, ट्रू जेटच्या ३ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
एअर इंडियाच्या १२४ तक्रारी प्रलंबित आहेत. त्याचे प्रमाण दर दहा हजार प्रवाशांमागे ०.६२ टक्के आहे. विमानात प्रवेश नाकारलेल्या ३,८३४ प्रवाशांना दिलेल्या सुविधांवर १ कोटी ६९ लाख ८१ हजार खर्च केले. उड्डाण रद्द झाल्याचा फटका १९ हजार ९७३ प्रवाशांना बसला. त्यांना पुरविलेल्या सुविधांपोटी ५४ लाख ५५ हजार खर्च केले. विमानाच्या उड्डाणाला विलंब झाल्याचा फटका २ लाख ८ हजार ८९२ प्रवाशांना बसला. त्यांना पुरविलेल्या सुविधांवर १ कोटी ९७ लाख ४६ हजार खर्च केले. उड्डाण रद्द झाल्याचा फटका एअर इंडियाच्या ९,३२४ प्रवाशांना बसला. त्यांना परतावा, हॉटेलमध्ये वास्तव्य, यासह इतर सुविधांवर २२ लाख रुपये खर्च केले. स्पाइसजेटच्या ५,९६६ प्रवाशांना उड्डाण रद्द झाल्याचा फटका बसला. त्यांना पुरविलेल्या सुविधांवर २० लाख ३६ हजार खर्च केले. इंडिगोच्या ३,१२३ प्रवाशांना उड्डाण रद्द झाल्याचा फटका बसला. २ तासांपेक्षा जास्त काळ उड्डाणाला विलंब झाल्याचा फटका सर्वात जास्त इंडिगोच्या ९६ हजार ६२० प्रवाशांना बसला. त्यानंतर एअर इंडियाच्या ५२ हजार ९३४ प्रवाशांना बसला, तर स्पाइसजेटच्या ३९ हजार ७९५ प्रवाशांना बसला. विस्ताराच्या १२ हजार १२ प्रवाशांना विलंबाचा फटका बसला. विमानात प्रवेश नाकारल्याच्या अधिक घटना एअर इंडियाच्या ३,०४३ प्रवाशांसोबत घडल्या. स्पाइसजेटच्या ६१३ तर इंडिगोच्या १३२ प्रवाशांना याचा फटका बसला.