- मनीषा म्हात्रेमुंबई - लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त केली. याबाबत चौकशी सुरू असतानाच भांडुप मधून ३ कोटींची रोकड जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही रक्कम बँक एटीएमची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत आयकर विभाग, पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्याकडून तपास सुरू आहे. रात्री उशिराने ही कारवाई करण्यात आली आहे.
रात्री उशिराने भांडुप सोनापुर परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी एक वाहन अडवले. त्यामध्ये तीन कोटींची रोकड मिळून आली. यामध्ये सुरक्षेचाही अभाव दिसून आल्याने त्यांना पोलीस ठाण्यात आणले. आयकर विभाग आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी पोलिसांत धाव घेत चौकशी सुरु केली आहे. ही रोकड बँक एटीएमसाठी असल्याचे बोलले जात आहे. उत्तर पूर्व मुंबईत आचारसंहिता जारी केल्यापासून यापूर्वी ९३ लाख ३७ हजारांची रोकड जप्त केली होती मुलुंड, घाटकोपर आणि मानखुर्द भागातून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चार गुन्हे नोंदवत आयकर विभागाकडून तपासणी सुरू आहे.
यामध्ये मुलुंडमधून १६ लाख ९८ हजार, घाटकोपर मधून ७२ लाख ३९ हजार ६७५ आणि मानखुर्द मधून अडीच आणि दीड लाखांची अशी एकूण ९३ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.