गेल्या दशकात बांधकाम उद्योगात ३ कोटी रोजगार; ‘एनारॉक’ व ‘नरेडको’चा अहवाल प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 12:00 PM2024-04-14T12:00:45+5:302024-04-14T12:01:03+5:30
गेल्या दशकभरात देशात झालेल्या गृहनिर्माण तसेच पायाभूत सुविधांच्या कामांच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात तीन कोटी नवे रोजगार निर्माण झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या दशकभरात देशात झालेल्या गृहनिर्माण तसेच पायाभूत सुविधांच्या कामांच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात तीन कोटी नवे रोजगार निर्माण झाले आहेत. बांधकाम क्षेत्रातील घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या ‘एनारॉक’ आणि उद्योजकांची संस्था असलेल्या ‘नरेडको’च्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे.
२०१३ मध्ये देशात बांधकाम क्षेत्रात ४ कोटी लोक कार्यरत होते. या संख्येत लक्षणीय वाढ होत आता ही संख्या सात कोटी दहा लाख झाल्याचे नमूद केले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येत बांधकाम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची टक्केवारी १८ टक्के आहे.
कोविडनंतर देशात पुन्हा बांधकाम उद्योगात तेजी आली आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगारात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत. बांधकाम उद्योगाला चालना मिळावी म्हणून सरकारने विविध धोरणांत केलेल्या बदलांचा फायदा वाढत्या रोजगारातून दिसून आल्याचा निष्कर्षदेखील यामध्ये काढण्यात आला आहे. दरम्यान, २०१४ ते २०२३ या कालावधीत देशात एकूण २९ लाख ३२ हजार घरांची निर्मिती झाली असून, यापैकी २८ लाख २७ हजार घरे विकली गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.