मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्र दौरा केला असून नाशिक आणि मुंबईतून विविध विकामकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्याहस्ते झाले. नाशिकमधील काळाराम मंदिरात त्यांनी स्वच्छता करुन सेवा दिली. यावेळी, संबोधित करताना मोदींनी युवा दिनाच्या निमित्ताने आणि माँ साहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. देश प्रगती करत असून देशाच्या प्रगतीचा सर्वात मोठा वाटा तरुणाईचा असल्याचं म्हटलं. तर, मुंबईतील अटल सेतूच्या उद्घटनानंतर बोलतान, गेल्या १० वर्षात भारत बदलल्याचं सांगितलं. दरम्यान, मोदींनी आपल्या भाषणात कुठेही मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला स्पर्श देखील केला नाही. त्यामुळे, यासंदर्भात उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी मोदींच्या आजच्या दौऱ्यावर भाष्य करताना, आता मराठा कोणाच्या पाया पडणार नाहीत, आम्ही लढून आरक्षण मिळवू, असे म्हटले. ''मोदींना सर्वसामान्यांची आता गरज राहिली नाही. मोदींच्या शिर्डी दौऱ्यावेळीही मी सांगितलं होतं की, तुम्ही राज्य सरकारला निर्देश द्या, कारण राज्य सरकारच्या अधिकारात निर्णय आहे, पण त्यांनी नाही केलं. त्यामुळे, आता त्यांच्या पाया पडण्याची गरज नाही, मराठाच बलवान आहे. आम्ही लढून आरक्षण मिळवू, कारण आम्ही खूप प्रेम केलं. पण, त्यांनी आमच्या वाटेला हे आणलं, आता आमचा नाईलाज आहे'', असे म्हणत जरांगे पाटील यांनी नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील नाशिक दौऱ्यावरुन टीका केली. मोदींनी नाशिक किंवा मुंबईतील भाषणात कुठेही मराठा आरक्षणाचा उल्लेख देखील केला नाही. त्या अनुषंगाने जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना जरांगेंनी मोदींच्या पाया पडणार नसल्याचं म्हटलं.
पुण्यात ३ करोडपेक्षा जास्त मराठे येणार
२० तारखेला एकही मराठा घरात राहणार नाही. मुंबईकडे निघाल्यानंतर सुरुवातीला हळू हळू बाहेर पडतील. पण, आम्ही मुंबईला जाण्याच्या अगोदर पुण्यात ३ करोडपेक्षा जास्त मराठा राहणार आहेत. एकही मराठा घरी राहणार नाही, माझी मराठ्यांना विनंती आहे, आता आरक्षण आणायचं आहे, आपल्या लेकरांसाठी बाहेर पडा, असे आवाहनच जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना केले आहे. कोणीही आपला नेता नाही, घरात तेल-मीठ कमी पडल्यावर कुणी १०० रुपये आणून देत नाहीत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. त्यादृष्टीने त्यांच्या गावभेटी आणि दौरे सुरू असून मराठा समाजातील बांधवांना ते मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करत आहेत. मुंबईपूर्वी पुण्यातच मराठ्यांची ताकद राज्य सरकारला दिसेल, पुण्यात ३ लाखांपेक्षा जास्त मराठा असतील, असे जरांगे यांनी म्हटले. त्यामुळे, जरांगेंच्या २० तारखेच्या आंदोलनाला शासन किंवा पोलीस प्रशासन कशाप्रकारे सामोरे जात आहे, हे पाहावे लागेल.