मुंबई - क्रिकेट सामन्यांसाठी सट्टेबाजी करण्यासाठी अवैधरित्या ऑनलाईन अँप चालविणाऱ्या एका टोळीचा ईडीने (सक्तवसुली संचालनालय) पर्दाफाश केला असून या प्रकरणी एकूण ३ कोटी ६८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे, कोलकाता व ओडीसामध्ये छापेमारी केली आहे.
दिनेश कुमार राठी या व्यक्तीने या ऑनलाईन अँपची सुरुवात केली होती. तसेच याद्वारे ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजी सुरू केली होती. यामध्ये सट्टा खेळणाऱ्या लोकांना भरघोस परताव्याचे आमीष देण्यात आले होते. देशभरातून अनेक लोकांनी या अँपमध्ये पैसे जमा केले होते. मात्र हे पैसे घेऊन राठी व त्याचे साथीदार पसार झाले तसेच हे अँप देखील कालांतराने बंद पडले. या प्रकरणी सर्वप्रथम ओडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मात्र, त्याची व्याप्ती देशभरात असल्यामुळे ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. ईडीने केलेल्या छापेमारी दरम्यान या टोळीच्या बँक खात्यात असलेली २ कोटी १४ लाख रुपयांची रक्कम तसेच १ कोटी ५४ लाखांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.