महिलांसाठी राज्यात ५०० डिजिटल कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:13 AM2019-09-21T06:13:39+5:302019-09-21T06:13:43+5:30
सध्याचे युग हे डिजिटल आहे.
मुंबई : सध्याचे युग हे डिजिटल आहे. या युगाशी स्पर्धा करण्यासाठी राज्यातील महिलांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने डिजिटल साक्षरता अभियान राबविण्याचा निर्णय राज्य महिला आयोगाने घेतला आहे. त्यानुसार, राज्यभरात ५०० कार्यशाळा घेतल्या जाणार असून, महिलांना विशेषत: ग्रामीण महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाची सफर घडवून आणली जाणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.
एक महिला शिकली की ती संपूर्ण घराला शिक्षित करते आणि आपल्या घरासोबतच इतर चार घरांमधील महिलांनाही शिक्षित करते. ‘डिजिटल साक्षरता’ ही काळाची गरज आहे. त्यामुळे महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम आणि स्वावलंबी करायचे असेल तर डिजिटल साक्षर करणे गरजेचे आहे. यासाठी विविध स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयांच्या मदतीने राज्यभर ५०० कार्यशाळा घेण्यात
येणार आहेत. यासाठी संस्थांना अनुदानही देण्यात आल्याचे रहाटकर म्हणाल्या.