मुंबई : राज्यात १८ जिल्हे हत्तीरोग प्रवण होते. त्यापैकी १० जिल्हे हत्तीरोगमुक्त करण्यात आले आहेत. पात्र व्यक्तींना हत्तीरोग गोळ्यांच्या सेवनाची खात्री करून २०२१ पर्यंत हत्तीरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.राज्यस्तरीय हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम सार्वत्रिक औषधोपचार मोहीम २०२०चे सोमवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते डिजिटल उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हत्तीरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी २ ते २० मार्च, २०२० पर्यंत नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड या सहा जिल्ह्यांत मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेची व्यापकता लक्षात घेऊन कालमर्यादा वाढविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीच्या माध्यमातून आंतरविभागीय समन्वय पर्यवेक्षण व जनजागृतीवर भर द्यावा. गृहभेटीशिवाय शाळा, महाविद्यालये, कार्यालये, कारखाने आणि गरजेनुसार बुथमार्फत नागरिकांनी गोळ्या सेवन कराव्यात, यासाठी नियोजनाप्रमाणे कार्यवाही व्हावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले. या मोहिमेचे ब्रॅण्डअॅम्बेसेडर स्वप्निल जोशी हे आहेत.>नागपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर औषधोपचारसध्या राज्यातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, गोंदिया, ठाणे व पालघर या आठ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. नांदेड, गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये डीईसी व अल्बेंडॅझोल हत्तीरोगविरोधी गोळ्यांचा वापर करण्यात येईल. यामध्ये दोन वर्षांखालील बालके, गरोदर माता, गंभीर आजारी व्यक्ती वगळून अन्य सर्वांना मोहिमेंतर्गत गोळ्या देण्यात येतील. मागील वर्षापर्यंत या मोहिमेमध्ये डीईसी व अल्बेंडॅझोल या दोन गोळ्यांचा समावेश होता. यंदा जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने आयव्हरमेक्टीन या अत्यंत प्रभावी औषधाचा अंतर्भाव प्रायोगिक तत्त्वावर नागपूर जिल्ह्यात करण्यात आला आहे. या तीन गोळ्यांचे सेवन सलग दोन वर्षे केल्यास हत्तीरोगापासून मुक्ती मिळणे शक्य आहे, असे शास्त्रीय अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
राज्यातील १० जिल्हे हत्तीरोगमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 5:46 AM