उज्ज्वला, ‘लाडकी बहीण’ला ३ मोफत सिलिंडर; राज्य शासनाचा निर्णय, नावे गॅस जोडणी असणे बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 07:13 AM2024-07-31T07:13:03+5:302024-07-31T07:14:17+5:30

‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून मंगळवारी जारी करण्यात आला. 

3 free cylinders to ujjwala ladki bahin decision of the state government | उज्ज्वला, ‘लाडकी बहीण’ला ३ मोफत सिलिंडर; राज्य शासनाचा निर्णय, नावे गॅस जोडणी असणे बंधनकारक

उज्ज्वला, ‘लाडकी बहीण’ला ३ मोफत सिलिंडर; राज्य शासनाचा निर्णय, नावे गॅस जोडणी असणे बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत उपलब्ध करून देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून मंगळवारी जारी करण्यात आला. 

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल. तसेच फक्त १४.२ किलोग्रॅम वजनाच्या सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल. 

असा मिळेल लाभ   

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत द्यावयाच्या ३ मोफत गॅस सिलिंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या ३०० रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन ५३० रुपये प्रति सिलिंडर इतकी रक्कम लाभार्थ्यांचा थेट बँक खात्यात जमा करेल.  लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर ८३० रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलिंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही. १ जुलै २०२४ रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल. १ जुलै २०२४ नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

अशी होईल अंमलबजावणी 

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व लाभार्थी निवडीसाठी मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी एक, तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहरासाठी नियंत्रक, शिधावाटप व संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल, तर संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत असेल. या दोन्ही समिती लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे (रेशन कार्डनुसार) कुटुंब निश्चित करेल. निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी, आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित केले जाईल.
 

Web Title: 3 free cylinders to ujjwala ladki bahin decision of the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.