Join us

१०० गुणांसाठी ३ तास अपुरे, दहावीच्या परीक्षापद्धतीनुसार वेळ वाढवून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 6:20 AM

सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण शिक्षण विभागाने सुरू केले आहे.

मुंबई : सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण शिक्षण विभागाने सुरू केले आहे. नवीन अभ्यासक्रमात परीक्षेच्या पद्धतीत अनेक त्रुटी असल्याचा सूर या प्रशिक्षणात शिक्षकांकडून उमटला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांचा विशेषत: भाषा विषयाचा पेपर १०० गुणांचा असेल. आधीच्या परीक्षा पद्धतीत ८० गुणांच्या पेपरसाठी ३ तास होते. आता १०० गुणांसाठीही तीनच तास असल्याने विद्यार्थ्यांना पेपर सोडवायला वेळ कमी पडेल, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. तसेच परीक्षेची वेळ वाढविण्यात यावी, अशी मागणीही शिक्षकांसह विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सध्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणादरम्यान परीक्षा पद्धतीत अनेक बदल आणि सूचना शिक्षकांकडून सुचविण्यात आल्या आहेत. बदललेल्या कृती अभ्यासक्रमाचा विचार करून परीक्षेचा कालावधी वाढविण्याची मागणी प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकांनी केली आहे. १०० गुणांच्या पेपरसाठी वेळ वाढवून देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. विद्यार्थी आणि पालकांनीही याला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या पद्धतीप्रमाणे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका या वेगवेगळ्या असतात. मात्र इतर शिक्षण मंडळाप्रमाणे कृतिपत्रिका आणि उत्तरपत्रिका या एकच असाव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, तसेच पेपरफुटीलाही आळा बसेल, असे मत शिक्षकांनी मांडले आहे.कृतिपत्रिकांवर एखादा कोड सेट केल्यास आणि त्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्यास वेगळ्या उत्तरपत्रिका छापण्याचा शिक्षण मंडळाचा खर्च वाचेल; शिवाय विद्यार्थ्यांनाही ते सोयीचे ठरेल, असा युक्तिवाद शिक्षकांनी शिक्षण प्रशिक्षणादरम्यान केला.सूचना विचारात घ्याव्यातबदललेल्या अभ्यासक्रमानुसार तसेच परीक्षा पद्धतीनुसार अनेक सूचना शिक्षकांनी प्रशिक्षणादरम्यान केल्या आहेत. शासनाने आणि शिक्षण मंडळाने त्या विचारात घेतल्या तर विद्यार्थ्यांचे हित साधता येईल, सोबतच शिक्षण मंडळासाठी त्या उपयुक्त ठरतील, असे मुंबई विभागाच्या परीक्षा मंडळाचे माजी सदस्य उदय नरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले.>शिक्षकांना प्रवासखर्च नाहीशिक्षक प्रशिक्षणादरम्यान दरवेळी शिक्षकांना प्रवासाचा खर्च आणि अल्पोपाहाराचा भत्ता दिला जातो. हे पैसे शिक्षकांच्या खात्यात जमा होत असतात. मात्र यंदा असा कोणताही खर्च किंवा मानधन देण्यात आले नसल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. यासंदर्भात शिक्षक निरीक्षक कार्यालयाकडूनही कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण किंवा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या नाहीत, अशी माहिती प्रशिक्षणासाठी गेलेल्या सेंट लॉरेन्स हायस्कूल, मालाडच्या शिक्षिका नलिनी गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :परीक्षा