३ लाख ३१ हजार ७५५ विद्यार्थ्यांना मोफत बस पास, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 06:53 AM2017-11-03T06:53:47+5:302017-11-03T06:54:15+5:30
महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस पास दिला जाणार आहे़ पहिल्या टप्प्यात आठ हजार विद्यार्थ्यांना व त्यानंतर टप्प्याटप्प्याने ३ लाख ३१ हजार २५५ विद्यार्थ्यांना मोफत बस पास दिले जाणार आहेत, असे प्रतिपादन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.
मुंबई : महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस पास दिला जाणार आहे़ पहिल्या टप्प्यात आठ हजार विद्यार्थ्यांना व त्यानंतर टप्प्याटप्प्याने ३ लाख ३१ हजार २५५ विद्यार्थ्यांना मोफत बस पास दिले जाणार आहेत, असे प्रतिपादन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.
पालिकेचा शिक्षण विभाग व बेस्टच्या वतीने ‘महापालिका शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस पास’चे वितरण महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत दादरमधील महापौर निवास येथे करण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच आपण ‘बेस्ट’चा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर केला आहे. आपण आणखी एका संकल्पाची पूर्तता केली आहे, असेही महापौरांनी या वेळी सांगितले. शिवडी कोळीवाडा मनपा शाळेतील पाच विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत बस पासचे या वेळी वितरण करण्यात आले.
महापालिकेच्या शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्याचा संकल्प असो की शालेय विद्यार्थ्यांना टॅब वितरण करण्याचा; यामागे एकमेव उद्देश हा महापालिका शाळेतील विद्यार्थी कुठल्याही स्पर्धेत मागे राहता कामा नये. बेस्टची परिवहन सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे़ लांबच्या ठिकाणी राहणारा विद्यार्थी हा अंतरामुळे शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
- आदित्य ठाकरे,
युवासेना प्रमुख