‘जेईई’, ‘नीट’साठी राज्यभरातून ३ लाख ३९ हजार २२७ विद्यार्थी; परीक्षेवरुन मतमतांतरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 03:10 AM2020-08-27T03:10:32+5:302020-08-27T07:07:38+5:30
काही विद्यार्थी परीक्षांना सामोरे जायला तयार; काहींना आरोग्याच्या सुरक्षिततेची काळजी
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अभियांत्रिकी आणि वैद्यकीय त्यांसाठी अनुक्रमे जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (जेईई) आणि नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट)च्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर तर नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होईल. दरम्यान, या दोन्ही परीक्षांना मिळून राज्यातून तीन लाख ३९ हजार २२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये विभिन्न मतप्रवाह असून काहींना आरोग्याच्या सुरक्षिततेविषयी धाकधूक आहे तर काही विद्यार्थी काहीही झाले तरी परीक्षा देण्याच्या तयारीत असलेले दिसून येत आहेत.
जास्तीतजास्त परीक्षा केंदे्र, एका वर्गात कमीतकमी विद्यार्थी, प्रवेशद्वारावर आरोग्यदृष्ट्या काटेकोर तपासणी आणि काळजी अशी योजना आहे. जेईई मेन परीक्षेला प्रति सत्र विद्यार्थी संख्या कमी करण्यात आली आहे. आधी प्रति सत्र १ लाख ३२ हजार विद्यार्थी देशभरात या परीक्षेला एका वेळी बसविण्यात येणार होते. ही संख्या आता कमी करून ८० हजारांवर आणण्यात आली आहे. परिणामी, सत्रांची संख्या ८ वरून १२ पर्यंत वाढविली आहे. जेईईसाठी महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे १,१०,३१३ विद्यार्थी ७४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देतील. नीटसाठी ६१५ केंद्रे असून २,२८,९१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
एवढे विद्यार्थी राज्यात प्रवेश परीक्षा देऊ शकतात तर अंतिम वर्षाची परीक्षा आयोजित करण्यात कोणती अडचण आहे, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रात परीक्षा घेण्यासाठी इच्छुकांकडून उपस्थित केला जात आहे.
परिस्थिती सुरक्षित नाही
आम्ही गेल्या काही वर्षांपासून नीटच्या परीक्षेची तयारी करीत आहोत. आता परीक्षा देण्याची वेळ आली आहे; मात्र परिस्थिती सुरक्षिततेची नाही. खबरदारी घेतली आणि संसर्ग झालाच तर तो आमच्या कुटुंबासाठी घातक ठरू शकतो. ही परीक्षा आणखी थोडी पुढे ढकलल्यास मदत होऊ शकेल. - साक्षी पेंडसे, नीट परीक्षार्थी उमेदवार
तयारी वाया जाईल
जेईईसाठीचा अभ्यास अकरावी, बारावीच्या अभ्यासासोबत केला आहे. आता तयारी बऱ्यापैकी झाली आहे. अशात परीक्षा कधी होणार? संसर्ग कधी थांबणार? याचा विचार करून आणखी लांबणीवर परीक्षा गेल्यास अनेकांची तयारी वाया जाऊ शकते. - रमेश महाजन, जेईई, परीक्षार्थी उमेदवार
परीक्षा पुढे ढकलण्यासाठी राजकीय पक्ष मैदानात
कोरोनाची सध्यपरिस्थिती पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी राजकीय पक्ष, विद्यार्थी, पालक संघटना करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा सतत लांबणीवर पडल्याने काही विद्यार्थी कंटाळले असून आता काहीही झाले तरी परीक्षा देऊच, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर, फिजिकल डिस्टन्सिंग पाळूनही सुरक्षितता राखली जाईल का, असा सवाल उपस्थित करीत परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी काही विद्यार्थ्यांकडून होत आहे. परीक्षा पुढे ढकलण्यासाठी राज्याने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारीही दाखविली आहे.
नीट परीक्षार्थी
परीक्षार्थी उमेदवार - २,२८,९१४
परीक्षा केंद्रे - ६१५
जेईई परीक्षार्थी
परीक्षार्थी उमेदवार - १,१०,३१३
परीक्षा केंदे्र - ७४