Join us

दफनविधीच्या जागेसाठी गमवावे लागले ३ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 06:35 IST

मरिन लाइन्स येथील प्रकार : बनावट पावतीच्या आधारे व्यावसायिकाची फसवणूक

मनीषा म्हात्रे

मुंबई : घर, नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार नवे नाहीत. मात्र, मरिन लाइन्स येथे एका व्यावसायिकाला दफनविधीच्या जागेसाठी ३ लाखांचा गंडा घातल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतल्या स्मशानभूमींत दलालांनी स्वत:चे जाळे निर्माण केल्याचीही माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात महम्मद रफीक शेखविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपाडा परिसरात व्यावसायिक अफजल बिजल (४८) हे कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईक अब्दुल मजिद मोतीवाला यांची मरिन लाइन्सच्या बडा कब्रस्थानात दफनची जागा आहे. या जागेसाठी दिलेल्या पिंक स्लीपशिवाय दफन करता येत नाही. ही स्लीप त्यांचे नातेवाईक अब्दुल मजिद मोतीवाला यांच्या ताब्यात होती. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांच्या काकांचे निधन झाले. त्यांना दफन करण्यासाठी त्यांनी बडा कब्रस्थान गाठले. मात्र पिंक स्लीप नसल्याने त्यांना तेथे दफन करण्यास विरोध केला. अखेर त्यांनी काकांना अन्य ठिकाणी दफन केले.त्यानंतर फातीया विधीकरिता ते बडा कब्रस्थानात गेले. तेथे त्यांची भेट महम्मद रफीक शेखसोबत झाली. त्यांनी झालेला प्रकार शेखला सांगितला. शेखने जुम्मा मशीद संस्थेच्या विश्वस्तांसोबत ओळख असल्याचे सांगून, काम करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी बडा कब्रस्थानला ३ लाखांचे डोनेशन द्यावे लागणार असल्याचे सांगितले. बिजलने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत जागेसाठी कुटुंबीयांकडून ३ लाख रुपये घेऊन शेखकडे दिले.काही दिवसांनी जुम्मा मशीदच्या विश्वस्तांकडे केलेला अर्ज त्यांनी स्वीकारल्याचे सांगून त्यांना ओट्याची २ हजार ९०० रुपयांची एक पावती आणि डोनेशनची ३ लाखांची पावती दिली. त्या पावतीवर जुम्मा मशीद आॅफ बॉम्बे ट्रस्ट असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, ९ महिन्यांनंतर पावती तपासली असता त्यांना संशय आल्याने त्यांनी जुम्मा मशीद ट्रस्टकडे याबाबत अधिक चौकशी केली. आपल्याकडे संबंधित नावाचा कोणताही अर्ज मिळाला नसल्याचे ट्रस्टकडून सांगण्यातआले. शिवाय पावत्याही बनावट असल्याचे सांगितल्याने त्यांना धक्काच बसला. त्यांनी थेटएल. टी. मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.अद्याप अटक नाही...या प्रकरणी अफजल बिजल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष राऊत यांनी दिली.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रमृत्यू