मुंबईकरांनो काळजी घ्या : महिनाभरात मलेरियाचे ७६७ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 03:01 AM2019-09-04T03:01:56+5:302019-09-04T03:02:10+5:30
मुंबईकरांनो काळजी घ्या : महापालिकेचे आवाहन
मुंबई : ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे ७६७ रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. मलेरियाप्रमाणेच गॅस्ट्रोचे ६२३ तर डेंग्यूचे १३४ रुग्णांची नोंद झाली आहे. मलेरियाची साथ रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
गेल्या महिन्याभरात आजारांच्या विषाणूंनी मुंबईकरांवर हल्ला केला आहे. आॅगस्ट महिन्यात डेंग्यूसदृश्य तापाचे १ हजार ८९४ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूप्रमाणेच डेंग्यूसदृश्य तापानेही अनेकांच्या शरीराचा ताबा घेतला आहे. साध्या तापानेही अनेकांना बेजार केले आहे. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात साथीच्या आजारांचे सात बळी गेले होते, यंदा चार जणांचा साथीच्या आजारांनी मृत्यू ओढावला आहे. जुलै महिन्यात लेप्टो आणि डेंग्यूने प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू ओढावला आहे. पावसाच्या दिवसात आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी वैयक्तिक आणि परिसराची स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घराच्या आजूबाजूला होणारी घाण साफ करणे जरुरीचे आहे. पावसाळ्यात ताजे व शिजवलेले अन्न सेवन करावे. बाहेरचे अन्न पदार्थ खायला देणे टाळावे. आइसस्क्रीम, कुल्फी, बर्फजन्य पदार्थ टाळावेत. उकळलेलेच पाणी प्यायला द्यावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
अस्वच्छतेमुळे जीवघेण्या आजारांची लागण
घाण, कचरा, चिखल व पाणी तुंबून ठेवणारी गटारे यामुळे अशा जीवघेण्या आजारांची लागण जलद होत असते. घराजवळील परिसरात उघडी गटारे, चिखल, घाण यांचे साम्राज्य असते. अनेक ठिकाणी घाण पाणी तुंबून राहते व जीवघेण्या जंतूंची, डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. यामुळे टायफॉईड, कॉलरा तापाच्या साथी येत असतात.