महिन्याभरात मुंबईकरांसाठी आणखी ३ जलतरण तलाव; गिल्बर्ट हिल येथील तलावाची नोंदणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 12:32 PM2023-09-04T12:32:02+5:302023-09-04T12:32:25+5:30
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाला ‘छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव’ असे नाव देण्यात येणार आहे.
मुंबई : गिल्बर्ट हिल जलतरण तलावाच्या माध्यमातून मुंबईकरांना रविवारी दहावा जलतरण तलाव पालिकेकडून उपलब्ध झाला आहे. दरम्यान, येत्या महिन्याभराच्या कालावधीत वरळी, विक्रोळी आणि अंधेरी पूर्व (कोंडीविटा) येथे जलतरण तलावाचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे आणखी तीन तलाव मुंबईकरांचं सेवेत उपलब्ध होतील असे सांगत लवकरच त्या ठिकाणीदेखील सदस्य नोंदणी ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती पालिकाकडून देण्यात आली.
गिल्बर्ट हिल या तलावाच्या सदस्य नोंदणीसाठी रविवारपासून सुरुवात झाली असून, २७५० सदस्यांना ऑनलाईन पद्धतीने सदस्यत्वाची नोंदणी करता येणार आहे. गिल्बर्ट हिल येथे पालिकेकडून नव्याने बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचे लोकार्पण मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी पार पडले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाला ‘छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव’ असे नाव देण्यात येणार आहे.
गिल्बर्ट हिल जलतरण तलाव नोंदणी सुविधा
१५ वर्षाखालील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग : ४ हजार ३७० रुपये
महिलांसाठी (२५ टक्के सवलत) : ६ हजार ३९० रुपये
वार्षिक शुल्क (सर्वसाधारण) : ८ हजार ४१० रुपये
पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार
दुबईतील सर्वाधिक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून बुर्ज खलिफा ही अतिशय उंच इमारत प्रसिद्ध आहे. मुंबईतील गिल्बर्ट हिल हीदेखील भूवैज्ञानिक वारसा म्हणून अतिशय मोलाचे आहे. परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा आणि त्यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
नोंदणी कुठे कराल?
सभासदत्वासाठी ३ सप्टेंबर सकाळी ११ वाजल्यापासून https://swimmingpool.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी खुली करण्यात आली आहे. हा जलतरण तलाव १ ऑक्टोबर २०२३ पासून खुला होईल.
समारंभाला शहर पालकमंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते. येथे मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्याही निधीची कमतरता पडू देणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.