Join us

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्लास वन अधिकाऱ्यासह ३ जण एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:07 AM

लघु टंकलेखकाच्या कपाटातून साडे तेरा लाखांची रोकड जप्तलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कामाची बिले मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या ...

लघु टंकलेखकाच्या कपाटातून साडे तेरा लाखांची रोकड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कामाची बिले मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंधेरी कार्यालयातील क्लास वन अधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. यात, लघुटंकलेखक संतोष अरविंद शिर्के (४७) याच्या कपाटातून साडेतेरा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, शिर्केसह क्लास वन अधिकारी असलेला कार्यकारी अभियंता मा. या. शंखपाळे, शाखा अभियंता महेंद्र भानुदास ठाकूर यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे सेवानिवृत्त असून सध्या मुलीच्या बांधकाम व्यवसायात मदत करतात. त्यांच्या मुलीचे २०१५-१६ मध्ये बांधकाम विभागासाठी केलेल्या कामाची सात लाखांची बिले थकीत होती. अशात वारंवार पाठपुरावा करूनदेखील हे अधिकारी बिल अदा करण्यात टाळाटाळ करत होते. तसेच ही बिले मंजूर करण्यासाठी ठाकूर यांनी मागणी केल्याप्रमाणे त्याला दीड लाख दिल्यानंतर सदर बिले मंजुरीसाठी पुढे पाठवण्यात आली. अशात बिले लवकरात लवकर मंजूर व्हावी यासाठी त्यांनी शंखपाळे यांची भेट घेतली. तेव्हा शंखपाळेने शिर्केला भेटण्याचा सल्ला दिला. तेव्हा शिर्केने बिलाच्या २० टक्के म्हणजेच एक लाख ४० हजार दिल्याशिवाय बिले मंजूर होणार नसल्याचे सांगितले. महिलेने अखेर ५० हजार रुपये दिले. तेव्हा एक बिल मंजूर केले. पुढे अन्य बिलासाठी उर्वरित ९० हजार रुपयांची मागणी केल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर गुरुवारी एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे शंखपाळेच्या सांगण्यावरून शिर्केने उर्वरित ९० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले आहे. पथकाने त्याच्या कार्यालयातील कपाटाची झडती घेतली. त्यात, १३ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली.