मुंबईत ३ हजार ८८५ खाटा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:06 AM2021-04-25T04:06:58+5:302021-04-25T04:06:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत मागील चार दिवसांतील रुग्णसंख्येचा आलेख पाहिल्यास काहीशी दिलासादायक स्थिती आहे. मागील आठवड्यात ९ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत मागील चार दिवसांतील रुग्णसंख्येचा आलेख पाहिल्यास काहीशी दिलासादायक स्थिती आहे. मागील आठवड्यात ९ हजारांच्या घरात असणारी दैनंदिन रुग्णसंख्या आता पाच हजारांच्या घरात आली आहे. दुसरीकडे शहर, उपनगरात आरोग्य यंत्रणा कमी पडू नये म्हणून मुंबई महानगरपालिका कंबर कसत आहे. मुंबईत २१ हजार ५५३ रुग्ण खाटा उपलब्ध आहेत. त्यातील १७ हजार ६६८ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. तर ३,८८५ रुग्ण खाटा रिक्त आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
सर्वसाधारण खाटा या १८ हजार ७०३ एवढ्या असून त्यातील १४ हजार ८६० खाटांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित ३,८४३ खाटा रिक्त आहेत. तसेच ऑक्सिजनच्या एकूण १० हजार ९८१ खाटा असून त्यातील १० हजार ६५ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. ९१६ ऑक्सिजन खाटा रिक्त आहेत. मुंबईत बाधित रुग्णाच्या संपर्कातील संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांना जोखमीच्या लोकांना सीसीसी वनमध्ये दाखल करण्यात येते. मुंबईमध्ये सध्या ४४ सीसीसी वन केंद्रे कार्यरत असून या सर्व ठिकाणी १३ हजार १५ जणांची क्षमता आहे. या सर्व ठिकाणी सध्या ९९३ एवढेच संशयित रुग्ण असून १२ हजार २२ जागा रिकामी आहेत. वरळी, मालाड, विक्रोळी ते भांडुप, माहीम, दादर, धारावी व घाटकोपर आदी भागांमधील रुग्णांना सीसीसी वन केंद्रात दाखल करण्यात येत असल्याचे पालिकेने सांगितले.
सीसीसी टूमध्ये ४ हजार ४४५ खाटा आरक्षित
लक्षणेविरहित व सौम्य लक्षणे असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना सीसीसी टूमध्ये दाखल करण्यात येते. मुंबईतील सीसीसी टू केंद्रात ८ हजार २११ खाटांची क्षमता आहे. परंतु सध्या या केंद्रांमध्ये केवळ ४,४४५ रुग्णखाटा भरलेल्या आहेत. त्यामुळे ३ हजार ७६६ खाटा या रिक्त आहेत. आतापर्यंत एकूण ६५ हजार २२३ रुग्णांवर सीसीसी टूमध्ये उपचार करण्यात आला आहे. सीसीसी टूमध्ये घाटकोपर, चेंबूर, विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम व पूर्व बाजू आणि खार ते सांताक्रुझ पूर्व आदी भागांमधील रुग्णांना मोठ्या संख्येने दाखल केले जात आहे. मुंबईतील एकूण रुग्णसंख्येपैकी ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण लक्षणेविरहित असून हे रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत असल्याचे समोर आले आहे.