Join us

आरेतील ५०० झाडे तोडली; आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 5:46 AM

उच्च न्यायालयाने वृक्षतोडीला विरोध करणाºया याचिका शुक्रवारी फेटाळताच प्रशासनाने सुमारे ५00 झाडे पाडली.

मुंबई : भुयारी मेट्रो-तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीत वृक्षतोड सुरू झाली असून, त्यास विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना रोखण्यासाठी पोलिसांना नाकाबंदी करावी लागली. शनिवारी सकाळी जमावबंदीचे आदेश लागू करून, पोलिसांनी राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड व शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, तसेच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या २९ जणांना नंतर सोडण्यात आले.

उच्च न्यायालयाने वृक्षतोडीला विरोध करणाºया याचिका शुक्रवारी फेटाळताच प्रशासनाने सुमारे ५00 झाडे पाडली. शनिवारी तिथे जाणारे रस्ते बंद केले. वृक्षतोड सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला. वृक्षतोडीचे फोटो काढले जाऊ नयेत, म्हणून आंदोलकांचे मोबाइलही ताब्यात घेतले. वृक्षतोडीविरोधात आंदोलकांनी केलेला अर्ज उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने शनिवारी फेटाळला.आरेतील स्थानिकांच्याही गाड्यांची तपासणी व चौकशी होत होती. प्रसारमाध्यमांनाही प्रवेशबंदी होती.

शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस, यांच्यासह पोलिसांच्या १० गाड्या तैनात होत्या. ज्यांनी आरेमध्ये वृक्षतोड केली त्यांच्यावर आम्ही सत्तेत आल्यानंतर काय ती कारवाई करू. आरेबद्दल मी स्वतंत्र पत्रपरिषद घेईन, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :आरेमुंबई