८० टक्के पडताळणी अहवाल १० दिवसांत; पासपोर्ट काढणं झालं सुलभ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 11:22 PM2019-07-23T23:22:58+5:302019-07-24T07:01:09+5:30
तुलसीदास शर्मा : पासपोर्ट तयार करण्याची प्रक्रिया सुलभ झाल्याने नागरिकांना दिलासा
खलील गिरकर
मुंबई : पासपोर्ट काढणे म्हणजे जिकिरीचे काम असा समज एकेकाळी होता. मात्र आता पासपोर्ट बनविण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. पासपोर्ट मिळविणे आता अत्यंत सहज सोपे झाल्याची माहिती तुलसीदास शर्मा यांनी दिली. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वांत मोठे केंद्र असलेल्या मुंबई विभागीय पासपोर्ट अधिकारी तुलसीदास शर्मा यांच्यासोबत साधलेला संवाद...
मुंबई पासपोर्ट कार्यालयाला पासपोर्ट तयार करण्याबाबत नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो?
उत्तर : मुंबई विभागीय पासपोर्ट कार्यालय हे देशातील सर्वांत मोठे विभागीय पासपोर्ट केंद्र आहे. त्यामुळे देशात सर्वांत जास्त प्रतिसाद या केंद्राला मिळतो. २०१७-२०१८ या कालावधीत या केंद्राद्वारे ९ लाख १५ हजार ५०३ जणांनी पासपोर्टसाठी अर्ज केले होते. त्यापैकी ८ लाख ९७ हजार ७३४ जणांना पासपोर्ट देण्यात आले. काही अर्जदारांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने त्यांचे अर्ज प्रलंबित राहिले होते. त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांनाही पासपोर्ट तयार करून देण्यात येईल. मुंबई विभागीय पासपोर्ट कार्यालयाच्या हद्दीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील १० जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय दमण, सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशांचादेखील समावेश आहे. यंदा १ जानेवारी ते ३० जून २०१९ या कालावधीत ४ लाख ३७ हजार ०१३ जणांनी पासपोर्टसाठी अर्ज केले होते. तर ४ लाख ४७ हजार ७०७ जणांना पासपोर्ट तयार करून देण्यात आले. गतवर्षीच्या प्रलंबित अर्जदारांपैकी ज्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली होती त्यांना पासपोर्ट तयार करून देण्यात आले.
सर्वांत जास्त अर्ज कोणत्या कारणामुळे प्रलंबित राहतात?
उत्तर : अर्जदारांचा अर्ज प्रलंबित राहण्याचे मुख्य कारण वास्तव्याचा चुकीचा पत्ता देणे हे आहे. अर्जदाराने त्याचा मूळ पत्ता देण्याऐवजी ज्या ठिकाणी वास्तव्य आहे तो पत्ता देणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीस पडताळणीमध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नाही व पुढील प्रक्रिया जलदपणे पार पडते.
पोलीस पडताळणी प्रक्रिया पूर्वीप्रमाणे आहे की त्यामध्ये सुधारणा झाली आहे?
उत्तर : पोलीस पडताळणी प्रक्रियेमध्ये पूर्वीच्या तुलनेत आमूलाग्र सुधारणा झाली आहे. त्यामुळे पासपोर्ट तयार होण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पूर्वी पोलीस पडताळणी अहवालासाठी किमान ३ आठवड्यांचा वेळ लागत होता. मात्र आता अर्जदाराची कागदपत्रे योग्य असतील तर अवघ्या एका आठवड्याच्या आत पोलीस पडताळणी अहवाल पासपोर्ट कार्यालयाला मिळतो.
टॅबमुळे पोलीस पडताळणी १० दिवसांत
पोलीस पडताळणी अहवालासाठी पोलिसांना टॅब देण्यात आले आहेत. त्यामुळे एका आठवड्यात अहवाल मिळू लागला आहे. एका आठवड्यात अहवाल आल्यावर पासपोर्ट विभागातर्फे पोलिसांना एका अहवालासाठी १५० रुपये दिले जातात; मात्र त्यापेक्षा जास्त विलंबाने अहवाल मिळाल्यास केवळ ५० रुपये दिले जातात. त्यामुळे पोलीस कर्मचारीदेखील पडताळणी अहवाल देण्यासाठी अधिक तत्परता दाखवितात; परिणामी अहवाल लवकर मिळतात.
८० टक्के अहवाल १० दिवसांत
एकूण अहवालांपैकी तब्बल ८० टक्के अहवाल १० दिवसांत मिळतात. त्यामध्ये पालघर, रायगड, ठाणे ग्रामीण, औरंगाबाद या जिल्ह्यांतील अहवाल १० दिवसांत मिळतात. पूर्वी सुमारे दीड महिन्याचा कालावधी केवळ अहवालासाठी लागत असे.