विलेपार्ल्यात डेंग्यूने घेतला 3 वर्षाच्या मुलीचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 01:30 PM2019-07-24T13:30:36+5:302019-07-24T13:36:52+5:30
नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबईत डेंग्यूने थैमान घालण्यास सुरवात केली आहे. विलेपार्ले पूर्व येथील आंबेवाडीतील तीन वर्षाची नेत्रा संजय शिवगण हिचा डेंग्यूने 22 जुलै रोजी विलेपार्ले पश्चिम येथील नानावटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.
याबाबत नेत्राचे वडिल संजय शिगवण यांनी सांगितले की, तिला दोन दिवस ताप आला होता. त्यामुळे तिचा 11 जुलै रोजी नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथील डॉ.हिरेन जोशी तीच्यावर उपचार करत होते. दरम्यान तीची प्रकृती खूपच खालावल्याने तीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले .दरम्यान, तिचा २२ जुलै रोजी मृत्यू झाला. आमच्या घरात माझी पत्नी, आई व वडील आणि नेत्रा असे चौघेजण राहत होते. मात्र, आमच्या एकुलत्या एक मुलीचा डेंग्यूने बळी घेतल्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे उपविभागप्रमुख जितेंद्र जानावळे यांनी शिगवण यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच या दुःखद घटनेमुळे परिसरातील रहिवाश्यांनमध्ये लहान मुलांन बद्दल चिंता व्यक्त होत आहे.आज सकाळी पालिका के पूर्व वॉर्डच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची भेट घेऊन आंबेवाडी व आजूबाजूच्या परिसरात डेंगू उत्पत्ती विरोधी जनजागृती व धूम्र औषध फवारणी त्वरित सुरू केली, अशी माहिती जानावळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.