बाजारात आॅफर्सचा भडिमार, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, ३० ते ७० टक्क्यांची सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:59 AM2018-08-14T03:59:16+5:302018-08-14T03:59:42+5:30
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच आॅफलाइन आणि आॅनलाइन खरेदीवर सवलतींचा वर्षाव केला जात आहे. त्यामुळे संकेतस्थळासह मॉल आणि शॉपिंग सेंटरमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडू लागली आहे.
मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच आॅफलाइन आणि आॅनलाइन खरेदीवर सवलतींचा वर्षाव केला जात आहे. त्यामुळे संकेतस्थळासह मॉल आणि शॉपिंग सेंटरमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडू लागली आहे. मोठ्या संख्येने ग्राहक खरेदी करत असल्याने, मॉल व शॉपिंग सेंटरमध्ये बिल तयार करण्यासाठीही ग्राहकांना अर्धा ते एक तास उभे राहावे लागत असल्याचे चित्र रविवारी मुंबईत दिसले.
लोअर परळसह, चर्चगेट, वांद्रे, दादर, मुलुंड अशा प्रमुख ठिकाणी असलेल्या बहुतेक मॉलमध्ये १५ आॅगस्टच्या निमित्ताने चांगल्या उत्पादनांवर ३० ते ७० टक्क्यांपर्यंत सूट ठेवण्यात आली आहे. त्यात ब्रँडेड कपड्यांसह रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, एअर कंडिशनर यांसह गृहोपयोगी वस्तूंचा समावेश आहे. कपड्यांमध्ये ७० टक्क्यांपर्यंत सूट देताना ‘बाय वन, गेट वन फ्री’च्या आॅफरला ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. याशिवाय, आॅनलाइन शॉपिंगवर घसघशीत सूटसह कॅशबॅकच्या आॅफरही ब्रँडेड कंपन्यांकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून आॅनलाइनसह आॅफलाइन खरेदीला पसंती दिली जात आहे. पुढील दोन दिवस खरेदीसाठी ग्राहकांच्या गर्दीत आणखी वाढ होईल, अशी माहिती लोअर परळ येथील एका मॉलमधील व्यवस्थापकाने दिली. गर्दीचे नियोजन करण्यासाठी एरव्ही बंद ठेवण्यात येणारे काउंटरही सुरू केल्याचे त्याने सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे, मॉलमधील रिकामे प्लॉट पार्किंगसाठी खुले करण्यात आले आहेत. यावरून रविवारपासून मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येचा अंदाज बांधता येतो, असेही त्या व्यवस्थापकाने सांगितले.
आॅफर्सनंतरही ग्राहक नाराज!
मॉलमध्ये आॅफर्स ठेवल्यानंतर ग्राहकांच्या नियोजनाकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त करत, एका ग्राहकाने नाराजी व्यक्त केली. गृहोपयोगी वस्तू खरेदी करताना, एका सेल्समनमागे चार ग्राहक उभे राहत आहेत. तर कपड्यांची निवड करताना चेंजिंग रूमबाहेर वेळ वाया जात आहे.
इतका खटाटोप केल्यानंतरही बिल तयार करतानाही तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याची तक्रार ग्राहकांमधून होत होती.
याउलट ठरावीक काळासाठी मनुष्यबळ वाढविता येत नसल्याने, ग्राहकांनी अशा वेळी आॅनलाइन खरेदीचा मार्ग निवडण्याची प्रतिक्रिया संबंधित मॉलच्या व्यवस्थापकाने दिली.