राज्यात पुण्यात ३० टक्के सक्रिय रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:06 AM2020-12-29T04:06:52+5:302020-12-29T04:06:52+5:30
मुंबई : राज्यातील ३० टक्के कोरोनाचे सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्या पाठोपाठ ठाण्यात १७ टक्के आणि मुंबईमध्ये १३ ...
मुंबई : राज्यातील ३० टक्के कोरोनाचे सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्या पाठोपाठ ठाण्यात १७ टक्के आणि मुंबईमध्ये १३ टक्के रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. राज्यात ५८ हजार ९१ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १४,५५८ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.
पुण्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात १०,५३७ आणि मुंबईमध्ये ८,२६० रुग्ण आहेत. देशात सक्रिय रुग्णांचे प्रमाण २.९ टक्के असून, राज्यात हे प्रमाण ३.०७ टक्के असल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले. राज्यात आतापर्यंत १८ लाख सात हजार ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्याच्या सक्रिय रुग्णांपैकी सात टक्के रुग्ण अतिदक्षता विभागाबाहेर ऑक्सिजनवर आहेत. तर सहा टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत असून उपचाराधीन आहेत. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत ६१ टक्के पुरुष रुग्ण असून ३९ टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत मृत्यू पावलेल्या कोरोना रुग्णांमध्ये अतिजोखमीच्या आजारांमुळे ७० टक्के रुग्णांचा मृत्यू ओढावला असून ३० टक्के मृत्यू अन्य कारणांमुळे झाले आहेत. राज्याच्या एकूण कोरोना मृत्यूंत ६५ टक्के बळी पुरुष रुग्णांचे गेले आहेत, तर ३५ टक्के मृत्यू महिला रुग्णांचे झाले आहेत.