मुंबईतील ३० पुरातन प्याऊंचे होणार टप्प्याटप्प्याने जतन आणि संवर्धन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 04:47 AM2019-01-27T04:47:34+5:302019-01-27T04:47:49+5:30
वास्तू विधान प्रोजेक्टच्या माध्यमातून मुंबईतील ३० हून अधिक प्याऊंचे जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे.
- सागर नेवरेकर
मुंबई : पूर्वीपासून सार्वजनिक ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याची नोंद इतिहासात असून, मशीद बंदर, शिवाजी पार्क, रे रोड, काळाचौकी, जिजामाता उद्यान, दादर येथील गोखले रोड, फोर्ट, काळबादेवी, वांद्रे इत्यादी ठिकाणी प्याऊ (पाणपोई) आहेत. महत्त्वाचे म्हणजे आता त्यांची दुरवस्था होऊ नये, म्हणून वास्तू विधान प्रोजेक्टच्या माध्यमातून मुंबईतील ३० हून अधिक प्याऊंचे जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे.
जगभरामध्ये सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याची व्यवस्था वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येते. गतिमान शहरात सार्वजनिक ठिकाणी लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था असावी, यासाठी ‘प्याऊ’ (पाणपोई) ही संकल्पना उदयास आली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत प्याऊ दिसून येतात, अशी माहिती वास्तू विधान प्रोजेक्टचे संस्थापक राहुल चेंबूरकर यांनी दिली.
मुंबईमधले प्याऊ हे फक्त माणसांसाठी नसून प्राण्यांसाठीही होते. त्या काळी स्थानिक लोकांनी प्याऊ हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे, तो जपून ठेवण्यासाठी त्याला चालवायला घेतले. ६० ते ७० च्या दशकामध्ये पिण्याचे पाणी घरा-घरामध्ये नळाद्वारे पोहोचले. ९०च्या दशकामध्ये सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी ठोस पावले उचलली गेली. त्या वेळी सांस्कृतिक वारसा जतनामध्ये प्याऊ आणि फाउंटन (कारंजे) यांचीही नोंद करण्यात आली.
मुंबईतील बहुतेक सर्व प्याऊ हे महापालिकेच्या अखत्यारित येतात. यातील काही प्याऊ हे खासगी जागेत आहेत. प्याऊंना एकच आर्किटेक्चर स्टाईल नाही. काही ठिकाणी आर्चेस, इस्लामिक कमानी, हिंदू पद्धतीचे कळस असे विविध प्रकारच्या बांधणीतले प्याऊ दिसून येतात. प्याऊची पाणी पडण्याची पद्धत वेगवेगळी आहे. या वर्षी सहा प्याऊचे लोकार्पण होईल. त्याची प्रक्रिया महापालिकेकडे सुरू आहे, असेही राहुल चेंबूरकर यांनी सांगितले.
प्याऊला क्युआर कोड
कोठारी प्याऊला क्युआर कोड देण्यात आला आहे. क्युआर कोड स्कॅन केल्यावर फेसबुक पेजवरून संपूर्ण माहिती मिळेल. अशा प्रकारे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. आता पुढे प्रत्येक प्याऊला क्युआर कोड दिला जाणार आहे. ऐतिहासिक दस्ताऐवजाचा जतन आणि संवर्धन करून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
प्लास्टिकच्या बाटल्यांची संख्या घटेल
प्याऊचे जतन आणि संवर्धन करून आताच्या काळात याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी प्याऊ सुरू केले, तर प्लास्टिकच्या बाटल्यांची संख्या घटेल, तसेच सांस्कृतिक पर्यटनाचा दर्जा मिळाला, तर मुंबईच्या संस्कृतीमध्ये लोकांना वेगळे काहीतरी बघायला मिळेल.