मुंबई : राणीच्या बागेतील प्राण्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने सर्वांत जास्त मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. १ एप्रिल २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या वर्षात राणीच्या बागेतील ४७ प्राणी, पक्ष्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला असून, त्यामध्ये ३० प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती वार्षिक अहवालातून पुढे आली आहे.
प्राणी संग्रहालयात पेंग्विन, वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, विविध पक्षी आहेत. एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२३ या वर्षात ४७ प्राण्यांचा मृत्यू झाला. त्यात ठिपके असलेले हरीण, इमू, मॅकाक रीसस, सांबर, आफ्रिकन पोपट, कासव यांचा समावेश आहे. यातील ३० प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला.
या मृत्यूमागची कारणे जाणून घेऊन त्याप्रकारे उद्यानाच्या वातावरणात व इतर अॅक्टिव्हिटीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.- गॉडफ्रे पिमेंटा, अध्यक्ष, वॉचडॉग फाउंडेशन
राणीच्या बागेत प्राण्यांच्या तसेच पक्ष्यांच्या पोपटासारख्या काही प्रजाती आहेत. ज्यांच्यात लिपिड किंवा कोलेस्टेरॉल विकार होण्याची शक्यता असते, ज्यामुळे हृदय धमनी रोग होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो . - सुनीश सुब्रमण्यम, संस्थापक सदस्य, पॉज मुंबई