मानखुर्दच्या चिल्ड्रन होम सोसायटीतील तब्बल ३० मुलांना कोरोनाची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 06:28 AM2020-07-27T06:28:32+5:302020-07-27T06:28:45+5:30
दोन आठवड्यांपूर्वी चिल्ड्रन्स होम सोसायटीमधील व्यवस्थापनाने मुंबई पालिकेशी संपर्क साधून काही मुलांना खोकला झाल्याची माहिती दिली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मानखुर्द येथील चिल्ड्रन्स होम सोसायटीमधील ३० मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी चिल्ड्रन्स होम सोसायटीमधील व्यवस्थापनाने मुंबई पालिकेशी संपर्क साधून काही मुलांना खोकला झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पालिकेने चिल्ड्रन्स होम सोसायटीमध्ये फिवर कॅम्पचे आयोजन केले होते. कॅम्पमध्ये एकूण २६८ मुलांचे स्क्रिनिंग करण्यात आले. यातील ८४ मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचे अहवाल आल्यानंतर ३० मुलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. या ३० पैकी दोघांना कर्करोग असल्याने त्यांच्यावर सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित २८ मुलांना वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, येथील परिसर संपूर्णपणे सील केला असून निर्जंतुकीकरणही करण्यात आले आहे. येथे कोरोनाचा फैलाव नेमका कसा झाला, याची चौकशी करण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.