पिकांचा ३० कोटींचा विमा
By Admin | Published: August 8, 2015 09:56 PM2015-08-08T21:56:00+5:302015-08-08T21:56:00+5:30
बळीराजाला पावसाकडून सातत्याने हुलकावणी दिली जात आहे. यातून ठाणे व पालघर जिल्ह्यातील भात हातून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यास काहीअंशी पायबंद घालण्यासाठी या दोन्ही जिल्ह्यांतील
- सुरेश लोखंडे, ठाणे
बळीराजाला पावसाकडून सातत्याने हुलकावणी दिली जात आहे. यातून ठाणे व पालघर जिल्ह्यातील भात हातून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यास काहीअंशी पायबंद घालण्यासाठी या दोन्ही जिल्ह्यांतील खरीप हंगामासाठी संरक्षित ‘पीकविमा’ योजना लागू करण्यात आली आहे. यानुसार, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसी) या दोन्ही जिल्ह्यांतील दोन लाख ३० हजार ३७२ कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांकडून ३० कोटी ७८ लाख ४७ हजार ८५० रुपयांचा संरक्षित पीकविमा काढला आहे.
हवामानावर आधारित पीकविमा योजना भात व नागली पिकास लागू करण्यात आली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे या खरीप हंगामात शेती नुकसान होण्याची शक्यता आहे. यातून मार्ग काढण्यासह शेतकऱ्यांना काहीअंशी नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पीकविमा योजना जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली आहे. यासाठी ‘एचडीएफसी अॅग्रो’ या कंपनीव्दारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा उतरविला गेला आहे.
यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील दोन लाख ३० हजार १२२ कर्जदार शेतकऱ्यांना हा पीकविमा टीडीसी बँकेने सक्तीचा केला तर इच्छूक २५० शेतकऱ्यांनीदेखील या पीकविम्याचा लाभ घेतला आहे.
या दोन्ही जिल्ह्यांतील दोन लाख ३० हजार ३७२ शेतकऱ्यांच्या २० हजार ५२३.१९ हेक्टरवरील भातपिकासाठी हा विमा काढण्यात आला आहे. या पीकविम्याव्दारे शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये संरक्षण मिळणार आहे. यानुसार, दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ३० कोटी ७८ लाख ४७ हजार ८५० रुपयांचे संरक्षण प्राप्त झाले आहे.
याकरिता शेतकऱ्यांकडून ४.८० टक्के दराने एक कोटी ४७ लाख ७६ हजार ६९६ रुपयांचा विमा हप्ता टीडीसी बँकेने वसूल केला आहे. यातील उर्वरित सुमारे ५० टक्के विमा हप्त्याची रक्कम राज्य शासनाने भरली असल्याचे टीडीसी बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. भोईर यांनी लोकमतला सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १९,६५,८२,३५० रुपये मिळणार संभाव्य नुकसानभरपाई!
यामध्ये ठाणे जिल्ह्णातील एक लाख ४० हजार ९० कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांच्या ११ हजार १८५.४५ हेक्टरचा पीकविमा काढला आहे. त्यासाठी त्यांनी ८० लाख ५३ हजार ८५२ रुपये हप्ता भरला आहे. यापोटी त्यांना १६ कोटी ७७ लाख ८२ हजार ३५० रुपयांची नुकसानभरपाई (रिस्क कव्हर) मिळणार आहे. याशिवाय, ४५ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी १९.२० हेक्टर क्षेत्राचा पीकविमा काढला असता त्यांना दोन कोटी ८८ लाख रुपये नुकसानभरपाई मिळणे शक्य आहे.
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १३,९७,४०,८२५ रुपये
पालघर जिल्ह्णातील ९० हजार ३२ कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांच्या नऊ हजार १५६.०५ हेक्टरच्या शेतीवरील भातपिकासाठी ६५ लाख ९२ हजार ३५६ रुपये विमा हप्ता भरला आहे. त्यापोटी त्यांना १३ कोटी ७३ लाख चार हजार ७५ रुपये संभाव्य नुकसानभरपाई मिळणार आहे. याशिवाय, २०५ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांच्या १६२.४५ हेक्टरवरील भातासाठी एक लाख १६ हजार ९६४ रुपये विमा हप्ता भरला आहे. यातून त्यांना २४ लाख ३६ हजार ७५० रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे.