रेल्वेच्या कल्व्हर्ट स्वच्छतेवर खर्च केलेले ३० कोटी पाण्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:06 AM2021-06-10T04:06:26+5:302021-06-10T04:06:26+5:30
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मुलुंडदरम्यान रुळांखालील १५ ठिकाणी नाल्यांच्या बंदिस्त प्रवाह मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करून देण्यासाठी ...
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मुलुंडदरम्यान रुळांखालील १५ ठिकाणी नाल्यांच्या बंदिस्त प्रवाह मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करून देण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विनंती केल्यानंतर ही कामे मुंबई महापालिका प्रशासनाने अवघ्या १५ दिवसांत पूर्ण केली. मात्र पहिल्या पावसातच मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाचे दावे फोल ठरले आहेत; कारण पहिल्याच पावसात लोकल ठप्प झाल्याने कल्व्हर्टची सफाई झाली की नाही? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
कुर्ला आणि सायन येथे बुधवारी पावसाचे पाणी साचल्याने मुंबई उपनगरीय रेल्वेसेवा बंद करण्यात आली. कल्व्हर्ट स्वच्छ न झाल्याचा फटका रेल्वेसेवेला बसला. मुळात मागील १२ वर्षांत ३० कोटींहून अधिक रक्कम रेल्वेच्या ११६ कल्व्हर्टवर खर्च करण्यात आली. मात्र आजच्या पावसात जणू काही ३० कोटी पाण्यात वाहून गेले आहेत, अशी टीका माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली. मुंबईतील रेल्वेअंतर्गत कल्व्हर्ट म्हणजे मोऱ्या रेल्वे प्रशासन प्रत्येक वर्षी स्वच्छ करते. पालिका प्रत्येक वर्षी तीन ते चार कोटी शुल्क अदा करते. मागील १२ वर्षांत रेल्वेला ३० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत; पण आजमितीस कोणत्याही प्रकारचे ऑडिट झालेले नाही.
सन २००९-२०१० ते २०१७-१८ या नऊ वर्षांत मुंबई पालिकेने रेल्वे प्रशासनाला २३ कोटी रुपये दिले होते. २०१८-१९ मध्ये ५.६७ कोटी रुपये दिले होते. या वर्षी पालिकेने सीएसएमटी ते मुलुंडपर्यंतच्या रेल्वेच्या सर्व नाल्यांची सफाई अवघ्या १५ दिवसांत पूर्ण केल्याचा दावा केला. मात्र पहिल्या पावसात सर्व दावे वाहून गेले.
* उपनगरीय रेल्वे मार्गांवरील कल्व्हर्ट
मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वेमार्गांवरील एकूण कल्व्हर्ट - सुमारे ११६
पश्चिम रेल्वेमार्गावर - ४१
मध्य रेल्वेमार्गावर - ५३
हार्बर रेल्वेमार्गावर - २२