पश्चिम उपनगरातील खड्ड्यांना ३० कोटींचा मुलामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:57 AM2018-05-23T01:57:05+5:302018-05-23T01:57:05+5:30
आर्थिक तरतूद : दोन वर्षांसाठीची आकडेवारी जाहीर, पूर्व उपनगर व शहरांसाठीही लवकरच प्रस्ताव
मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्ते ‘खड्ड्यात’ जात मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. काँक्रिट व डांबरी रस्त्यांनी मुंबई खड्डेमुक्त करण्याची घोषणा महापालिकेने यापूर्वीच केली आहे. या वर्षी सुमारे एक हजार रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. मात्र, मुंबई खड्डेमुक्त होण्याची शाश्वती पालिका प्रशासनाला नाही. म्हणूनच यंदाही पावसाळापूर्व, पावसाळ्यात व त्यानंतरही मुंबई खड्ड्यातच जाणार असे गृहीत धरून, ते बुजविण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार, वांद्रे ते दहिसर या पश्चिम उपनगरातील रस्त्यांवर पावसाळ्यात पडणारे खड्डे बुजविण्यासाठी २०१८ ते २०२० या दोन वर्षांत ३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. लवकरच पूर्व उपनगर व शहर भागासाठीही
खड्डे दुरुस्तीचा प्रस्ताव तयार होणार आहे.
मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्राधान्य क्रम ठरवून रस्त्यांची डागडुजी सुरू केली आहे. त्यानुसार, या वर्षी एक हजार १०६ रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. पैकी ५२२ कामे पावसाळ्यापूर्वी, तर उर्वरित ५८४ कामे पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहेत. मेट्रो, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अशा विविध प्राधिकरणाचे विकास काम मुंबईत सुरू आहे. या खोदकामांमुळे मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते सध्या असमतोल झाले असून, काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात यामध्ये आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे खड्डे भरण्यासाठी पालिका प्रशासनाने आर्थिक तरतूद केली आहे.
प्रस्ताव पटलावर : वांद्रे ते दहिसर या पट्ट्यातील रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर पडणारे खड्डे भरण्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. सन २०१८-१९ ते २०१९-२० पावसाळापूर्व रस्त्यांवरील खराब भागांची दुरुस्ती व पावसाळ्याच्या दरम्यान खड्डे दुरुस्तीसाठी वांद्रे, खार, सांताक्रुज या विभागाला १० कोटी, विलेपार्ले ते मालाड आणि कांदिवली ते दहिसर असे प्रत्येकी १० कोटी रुपयांची तरतूद आहे. तूर्तास पश्चिम उपनगरातील खड्डे भरण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. या पाठोपाठ शहर आणि पूर्व उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहेत.
रस्त्याच्या कामांची वर्गवारी
रस्त्यांच्या कामांची वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये ‘प्रकल्प रस्ते’ व ‘प्राधान्यक्रम रस्ते’ अशा दोन प्रमुख वर्गवारी आहेत. ‘प्रकल्प रस्ते’ या वर्गवारी अंतर्गत पुनर्बांधणी करण्यात येणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. ‘स्टॅक’समिती यांच्या सल्ल्यानुसार तयार केलेल्या धोरणानुसार रस्त्याचा पाया, खडीकरण, पृष्ठीकरण इत्यादी सर्व कामांचा यात समावेश होतो.
३१ मेचे आव्हान
मुंबईत तब्बल एक हजार १०६ रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. यापैकी सध्या ५२२ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये ४६ मुख्य रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. मात्र, पावसाळ्याला अवघा एक महिना उरला असल्याने, ३१ मे पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे आहे.
हे असतील कंत्राटदार
उपरोक्त दोन वर्षांकरिता परिमंडळ तीनमध्ये पावसाळ्यापूर्वी साडेतीन कोटी रुपये, तर पावसाळ्याच्या दरम्यान एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व या विभागांमध्ये-प्रत्येकी ५० लाख रुपये खड्डे दुरुस्तीसाठी खर्च करण्यात येणार आहे. या कामाचे कंत्राट मेसर्स मंदीप एन्टरप्रायजेस या कंपनीला देण्याचे प्रस्तावित आहे. परिमंडळ चारमध्ये पावसाळ्यापूर्वी साडेतीन कोटी रुपये, तर पावसाळ्याच्या दरम्यान के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर या विभागांमध्ये - प्रत्येकी ५० लाख रुपये खड्डे दुरुस्तीसाठी खर्च करण्यात येणार आहे. या कामाचे कंत्राट कमला कन्स्ट्रक्शन कंपनीला देणे प्रस्तावित आहे.
परिमंडळ सातमध्ये पावसाळ्यापूर्वी साडेतीन कोटी रुपये, तर पावसाळ्याच्या दरम्यान आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर विभागांमध्ये - प्रत्येकी ५० लाख रुपये खड्डे दुरुस्तीसाठी खर्च करण्यात येणार आहे. या कामाचे कंत्राट कैलास कन्स्ट्रक्शन कंपनीला देणे प्रस्तावित आहे.