Join us

शौचालयांसाठी ३० कोटी

By admin | Published: October 12, 2015 4:26 AM

जिल्ह्यातील प्रत्येक गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागापाठोपाठ आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे (नरेगा) देखील वैयक्तिक शौचालये बांधण्याचे नियोजन केले आहे.

सुरेश लोखंडे,ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागापाठोपाठ आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे (नरेगा) देखील वैयक्तिक शौचालये बांधण्याचे नियोजन केले आहे. यासाठी जिल्हाभरात सुमारे २५ हजार ४३ शौचालये नव्याने बांधण्याचे प्रस्तावित केले. यासाठी सुमारे तीस कोटी पाच लाख रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. त्यावर, स्थानिक कुशल व अकुशल मजुरांना प्राधान्याने रोजगार दिला जाणार आहे.या आर्थिक वर्षात नरेगाने जिल्ह्यात सुमारे १० हजार ४१ वैयक्तिक शौचालयांची कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी १२ कोटी चार लाख ९२ हजार रुपये खर्चाची तरतूद केली आहे. या कामांवरदेखील स्थानिक गावपाड्यांच्या कुशल, अकुशल कामगारांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. जिल्ह्यातील ४२७ ग्रामपंचायतींव्दारे करण्यात येत असलेल्या सेल्फच्या कामांमध्ये वैयक्तिक शौचालये बांधण्याचेदेखील नियोजन केले आहे. त्यानुसार, आतापर्यंत सर्व तालुक्यांमधील कामे पूर्ण झालेली असून केवळ भिवंडी तालुक्यात ११७ व कल्याणमध्ये १९ कामे अर्धवट असून ती युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहेत.गावातील एकही व्यक्ती रस्त्याच्या कडेला किंवा अन्य ठिकाणी उघड्यावरशौचास बसू नये, म्हणून प्रत्येक घराला वैयक्तिक शौचालय बांधणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी नरेगाव्दारे घरमालकास १२ हजार रुपयांचे अनुदान मंजूरही केलेले आहे. यानुसार, वर्षभरात १० हजार शौचालयांची कामे पूर्ण केली जात आहेत. उर्वरित गावपाड्यांसाठी २५ हजार ४३ शौचालयांसाठीदेखील अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटी पाच लाख रुपये खर्च अपेक्षित धरला आहे.