Join us

३० फूट उंचीचे निर्बंध कायम

By admin | Published: August 21, 2015 1:18 AM

मुंबई शहर आणि उपनगरांत गणेशोत्सव साजऱ्या करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर परवानग्यांची टांगती तलवार कायम आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपांसाठी धोरणानुसार

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत गणेशोत्सव साजऱ्या करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर परवानग्यांची टांगती तलवार कायम आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपांसाठी धोरणानुसार घालण्यात आलेले ३० फुटांचे निर्बंध कायम आहेत. मंडळांना सुरुवातीला महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार असून, त्यानंतर पोलिसांसह वाहतूक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्यांबाबत सोमवारी झालेल्या घडामोडींनंतर पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मंडळांना १० दिवसांत महापालिकेची परवानगी मिळेल, असा सूर निघाला होता. प्रत्यक्षात मात्र त्यानंतरही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणखी बुचकळ्यात पडली. अखेर यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी महापालिका मुख्यालयाच्या सभागृहात प्रशासन आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीमध्ये बैठक झाली. महापौर स्नेहल आंबेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, आयुक्त अजय मेहता आणि बृहृन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार येत्या सोमवारपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून महापालिकेच्या संबंधित विभागात परवानगीसाठीचे अर्ज सादर केले जाणार आहेत. तात्पुरत्या बांधकामांसाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असणार आहे.बांधकाम आराखडा, नकाशा, मंडपाची लांबी-रुंदी यासह उर्वरित तपशील मंडळांना प्रशासनाला सादर करावा लागणार आहे. शिवाय मंडपांसाठी परिसरात खणण्यात येणारे खड्डे मंडळांनाच बुजवावे लागणार आहेत. ते न बुजवल्यास प्रतिखड्डा २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. अग्निशमन दलाच्या नियमांची पूर्तताही मंडळांना करावी लागणार आहे. जाहिराती धोरणानुसार मंडळांना महापालिकेला रक्कम मोजावी लागेल. विशेषत: महापालिकेकडून मंडळांना प्राप्त होणारी परवानगी मंडपाच्या प्रवेशद्वारावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)