निवडणूक काळात ३० लाख लीटरची दारू, २०७ कोटींचा ड्रग्ज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2024 09:03 PM2024-04-08T21:03:36+5:302024-04-08T21:03:58+5:30
१० लाख ५३ हजार ५४५ ग्राम एवढा २०७. ४५ कोटींचा ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे
श्रीकांत जाधव
मुंबई - सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून मतदारांना मतांसाठी प्रलोभन दाखवण्यासाठी अवैध दारू,ड्रग्ज, मौल्यवान वस्तू, रोख रक्कमेचा वापर केला जात आहे. कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांनी प्रतिबंधात्मक कारवाई करीत राज्यभरात ३० लाख लीटरची दारू, २०७ कोटींचा ड्रग्ज यांचा समावेश असलेला ३९८. २० कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्यामध्ये १ मार्च ते ५ मार्च या कालावधीत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे अवैध दारू, ड्रग्स, रोख रक्कम, मौल्यवान धातू यांची जप्ती करण्यात आली असल्याची माहिती सोमवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धी पत्रकातद्वारे दिली.
त्यानुसार १० लाख ५३ हजार ५४५ ग्राम एवढा २०७. ४५ कोटींचा ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. तर २ लाख ७५ हजार ८३१ ग्राम इतकी मौल्यवान धातू पकडण्यात आला आहे. त्याची किंमत ५५. १० कोटी आहे. तसेच फिब्रीजची संख्या ४ हजार २७२ आहे. ती ०. ४२ कोटीची आहे. तर इतर वस्तू ११ लाख ३६ हजार १०२ असून त्याची किंमत ७२. ८५ अशी आहे. रोख रक्कम ३८ . १२ कोटी मिळून सर्व मुद्देमाल ३९८. २० कोटींचा आहे.