तिकिटासाठी ३० लाखांची लाच
By admin | Published: January 4, 2017 04:38 AM2017-01-04T04:38:21+5:302017-01-04T04:38:21+5:30
पालिका निवडणुकीत शिवसेनेकडून तिकीट मिळवून देण्यासाठी मानखुर्दमधील एका विभागप्रमुख आणि नगरसेवकाने तब्बल ३० लाखांची मागणी केल्याचा आरोप एका इच्छुक
मुंबई : पालिका निवडणुकीत शिवसेनेकडून तिकीट मिळवून देण्यासाठी मानखुर्दमधील एका विभागप्रमुख आणि नगरसेवकाने तब्बल ३० लाखांची मागणी केल्याचा आरोप एका इच्छुक उमेदवाराने केला आहे. ठरलेल्या रकमेपैकी १० लाख रुपये देऊनही आणखी २० लाखांची मागणी केल्याचे या इच्छुकाचे म्हणणे आहे. हा सगळा प्रकार शिवसेना पक्षप्रमुखांना पत्र लिहून कळविल्याचेही त्याने सांगितले. याबाबत सर्व पुरावे आपल्याजवळ असल्याची माहितीही त्याने दिली.
मानखुर्दमधील प्रभाग क्रमांक १३५ येथे राहणारे मनोजकुमार सिंह हे परिसरातील सपाचे नगरसेवक शांताराम पाटील यांचे सक्रिय कार्यकर्ते होते. तथापि, शांताराम पाटील सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर सिंहदेखील सेनेत आले. सिंह यांची पत्नी गीता सिंह या शिक्षिका आहेत. प्रभाग क्र. १३५ महिलांसाठी राखीव झाल्यामुळे तेथून सेनेची उमेदवारी मिळावी, म्हणून त्या इच्छुक आहेत.
मनोजकुमार सिंह यांनी नगरसेवक शांताराम पाटील यांच्यामार्फत विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांना आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून निवेदन दिले. सेनेची उमेदवारी हवी असल्यास मला व विभागप्रमुख राऊत यांना ३० लाख रुपये दे, अशी मागणी नगरसेवक शांताराम पाटील यांनी आपल्याकडे केल्याचा आरोप मनोज सिंह यांनी केला आहे.
त्यानुसार सिंह यांनी नगरसेवक पाटील यांना आगाऊ रक्कम म्हणून १० लाख रुपये दिले. तर दुसऱ्या दिवशी विभागप्रमुख राऊत यांनी एकट्याला घरी बोलावून आणखी २० लाखांची मागणी करत तुमच्या पत्नीलाच उमेदवारी मिळणार, असे खात्रीशीरपणे सांगितल्याचे सिंह यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र काही दिवसांनंतर अचानक ही उमेदवारी शांताराम पाटील यांच्या सुनेलाच मिळणार असल्याचे स्पष्ट होताच सिंह यांनी पाटील यांच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केली.
दिलेल्या रकमेतील केवळ ५ लाख रुपयेच त्यांनी परत दिल्याचे सिंह यांनी सांगितले. शिल्लक पैशांसाठी वारंवार मागे लागूनही
पैसे परत न मिळाल्याने शिवसेना पक्षप्रमुखांना पत्र लिहिल्याचे
सिंह यांनी सांगितले. याबाबतचे
सर्व पुरावे, संभाषणे आपल्याकडे असून तीदेखील पक्षप्रमुखांना पाठविल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
तिकीट देणे माझ्या हातात नाही, उलट मीच सिंह यांच्या पत्नीला तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करीत होतो. मात्र यादीत नाव न आल्याने सिंहने माझ्यावर खोटा आरोप केला आहे. याबाबत मानखुर्द पोलीस ठाण्यात बदनामीची तक्रार दाखल केली आहे. - शांताराम पाटील, नगरसेवक.
हा वाद शांताराम पाटील आणि सिंह या दोघांमधला आहे. माझा आणि माझ्या पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही. शिवाय तिकीट देणे हे पक्षप्रमुखांच्या हातात असते. शिवसेनेला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. - राजेंद्र राऊत, विभागप्रमुख.