आरक्षित भूखंडावर ३० लाखांचा खर्च
By admin | Published: June 11, 2015 05:44 AM2015-06-11T05:44:30+5:302015-06-11T05:44:30+5:30
सूर्योदय सोसायटीच्या ताब्यातील आरक्षित भूखंडावर पालिकेने कोणतीच परवानगी न घेता लाखो रुपये खर्च केले आहेत.
अंबरनाथ : सूर्योदय सोसायटीच्या ताब्यातील आरक्षित भूखंडावर पालिकेने कोणतीच परवानगी न घेता लाखो रुपये खर्च केले आहेत. यासंदर्भात सोसायटीने हरकत घेतली आहे. तर, दुसरीकडे या कामांपैकी १५ लाखांची देयकेही पालिकेने अदा केली आहेत.
सिटी सर्व्हे क्रमांक ७३१० आणि ७३११ या भूखंडांवरील ९६९० चौरस मीटर जागेवर पालिकेने बेकायदेशीररीत्या विकासकामे केली आहेत. ही जागा सूर्योदय सोसायटीच्या ताब्यात असून तिचा विकास करण्यासाठी सोसायटीची परवानगी गरजेची होती. मात्र, ती न घेताच पालिकेने या मैदानावर विविध विकासकामे केलेली आहेत. या मैदानाला संरक्षक भिंत बांधणे, मैदानाच्या परिसरात जॉगिंग ट्रॅक उभारणे, ओपन जिम आणि लहान मुलांचे उद्यान उभारण्यात आले आहे. या परिसरात पालिकेने सुरू केलेले काम थांबविण्यासंदर्भात स्वत: सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी पालिकेला पत्रदेखील दिले होते. मात्र, असे असतानाही पालिकेने सर्व कामे केली आहेत. हे प्रकरण येथेच थांबले नसून या कामाचे तब्बल ३० लाखांची देयके काढण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. त्यापैकी १५ लाखांचे बिल पालिकेने याआधीच काढले आहे. यासंदर्भात शहर अभियंता सुहास सावंत यांना विचारले असता हा भूखंड नागरी सुविधांसाठी आरक्षित असून पालिकेने या जागेवर नागरिकांच्या सुविधेसाठी हा खर्च केला आहे. (प्रतिनिधी)