खलील गिरकर मुंबई : नोव्हेंबर २०१८ मध्ये देशभरात ३० लाख २४ हजार ग्राहकांनी मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी (एमएनपी) सुविधेचा लाभ घेतला. ऑक्टोबर महिन्यात ३० लाख २२ हजार ग्राहकांनी एमएनपी सुविधेचा लाभ घेतला होता. त्या तुलनेत यामध्ये वाढ झाली आहे. ही सुविधा सुरु झाल्यापासून आतापर्यंत याचा लाभ घेतलेल्या ग्राहकांची संख्या ४० कोटी ७० लाख झाली आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.देशात सर्वात जास्त एमएनपीचे अर्ज राजस्थानमधून ३८.५६ दशलक्ष इतके करण्यात आले आहेत. त्याखालोखाल तामिळनाडू मधून ३४.६९ दशलक्ष ग्राहकांनी अर्ज केले आहेत. महाराष्ट्रातील २८.९२ दशलक्ष ग्राहकांनी तर मुंबईतील २१.२८ दशलक्ष ग्राहकांनी एमएनपी सुविधेचा लाभ घेतला आहे.देशात सध्या ११९३.७२ दशलक्ष टेलिफोन व मोबाईल ग्राहक आहेत. त्यामध्ये मोबाईल ग्राहकांची संख्या ११७१.७६ दशलभ आहे. त्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात १.७४ दशलक्ष ग्राहकांची वाढ झाली आहे. तर, २१.९६ दशलक्ष ग्राहक लँडलाईनचे ग्राहक आहेत नोव्हेंबर महिन्यात त्यामध्ये ०.०६ दशलक्ष ग्राहकांची घट झाली आहे. एकूण ग्राहकांमध्ये १.६८ दशलक्ष ग्राहकांची वाढ झाली आहे.शहरी भागात मोबाईल व लँडलाईन मिळून एकूण ६६४.५४ दशलक्ष ग्राहक आहेत. त्यापैकी शहरी भागात मोबाईल ग्राहकांची संख्या ६४५.७१ दशलक्ष आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यात २.५४ दशलक्ष ग्राहकांची घट झाली. लँडलाईन ग्राहकांची संख्या १८.८३ दशलक्ष होती त्यामध्ये ०.०५ दशलक्ष ग्राहकांची घट झाली.नोव्हेंबर महिन्यात ग्राहक संख्या वाढलीदेशातील मोबाईल व लँडलाईन ग्राहकांची संख्या आॅक्टोबर महिन्यात ११९२.०४ दशलक्ष वरुन नोव्हेंबर महिन्यात ११९३.७२ दशलक्ष झाली आहे. यामध्ये ०.१४ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यापैकी शहरी भागातील ६६७.१२ दशलक्ष ग्राहकांवरुन ही संख्या नोव्हेंबर महिन्यात ६६४.५४ दशलक्ष झाली आहे. तर ग्रामीण भागातील ५२४.९१ दशलक्ष मध्ये वाढ होऊन ही संख्या नोव्हेंबर महिन्यात ५२९.१८ दशलक्ष झाली आहे. शहरी विभागात ग्राहकांच्या संख्येत ०.३९ टक्के घट झाली तर ग्रामिण भागात ०.८१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
नोव्हेंबरमध्ये ३० लाख ग्राहकांनी केले मोबाइल पोर्ट; ट्रायची आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 5:17 AM