मुंबई : विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार झालेला आपण पाहिला आहे. मात्र, परळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने चक्क सेवानिवृत्त झालेल्या ३0 श्वानांचा सन्मान करण्यात आला. या अनोख्या सोहळ्यात उपस्थितांनी श्वानांच्या या सन्मानाचे भरभरून कौतुक केले.पशू महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात डॉ. संदीप कारखानीस, आयपीएस अधिकारी संजय सक्सेना, माजी पोलीस आयुक्त संजीव दयाळ यांच्या हस्ते रविवारी या श्वानांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अॅनिमल एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका रोहिणी फर्नांडिस, डॉ. आशिष पातुरकर, अभिनेत्री सई ताम्हणकर, एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे आदी मान्यवर उपस्थित होते. मुक्या जिवांचा सन्मान ही संकल्पना अतिशय उत्तम असून, या माध्यमातून त्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व अधोरेखित करण्याची संधी मिळते आहे. त्यामुळे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे डॉ. आशिष पातुरकर यांनी या वेळी म्हटले.परळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील २०१५-१६ सालच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी श्वानांचा सन्मान करण्याची संकल्पना गेल्या वर्षी राबवली होती. त्या वेळी या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने, २०१६-१७ मध्येदेखील विद्यार्थी परिषदेत ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे, जीआरपी, आरपीएफ, सीआयएसएफ, बीडीडीएस, एनडीआरएफ, विमानतळ कस्टम आदी १८ खात्यांतील सेवानिवृत्त झालेल्या एकूण ३0 श्वानांचा सत्कार करण्यात आला असून, त्यापैकी ६ श्वानांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने २00६ साली पश्चिम रेल्वेमधील साखळी बॉम्बस्फोटात उत्तम कामगिरी बजावलेल्या श्वानांपैकी, मॅक्स, सँडी, आॅस्कर, शॉटगन आणि नोटी या श्वानांचा समावेश आहे. या सत्कारात श्वानांना त्यांचे नाव कोरलेली नेमप्लेट, प्रमाणपत्र, सुवर्ण पदक, गळपट्टा, गुडी बॅगदेखील देण्यात आली. हे सर्व श्वान साधारण १0 ते १२ या वयोगटांतील होते. (प्रतिनिधी)
पोलीस पथकातील सेवानिवृत्त झालेल्या ३० श्वानांचा सन्मान!
By admin | Published: April 10, 2017 6:34 AM