Mumbai: कोस्टल रोडवरून तरुणाने समुद्रात उडी घेत जीवन संपवलं, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न; असं का केलं?

By मनीषा म्हात्रे | Updated: March 20, 2025 10:50 IST2025-03-20T10:48:38+5:302025-03-20T10:50:40+5:30

कोस्टल रोडवरून उडी घेत मालाडच्या तरुणाने आयुष्य संपविल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री पावणे आठच्या सुमारास त्याने समुद्रात उडी घेतली.

30 year old man dies by suicide after jumping into sea from coastal road sea link connector in worli | Mumbai: कोस्टल रोडवरून तरुणाने समुद्रात उडी घेत जीवन संपवलं, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न; असं का केलं?

Mumbai: कोस्टल रोडवरून तरुणाने समुद्रात उडी घेत जीवन संपवलं, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न; असं का केलं?

मनीषा म्हात्रे, मुंबई-

कोस्टल रोडवरून उडी घेत मालाडच्या तरुणाने आयुष्य संपविल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री पावणे आठच्या सुमारास त्याने समुद्रात उडी घेतली. बुधवारी सर्च ऑपरेशनदरम्यान त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. दर्शीत राजू भाई सेठ (३०) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी वरळी पोलीस तपास करत आहे. चार महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

मालाडचा रहिवासी असलेला दर्शीत बीकेसीतील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्याचे लग्न झालेले. घरी आई, पत्नीसोबत राहायचा. मंगळवारी तो नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडला. सायंकाळी कामावरून स्वतच्या खासगी कारने कोस्टल रोडवर एक फेरी मारली. त्यानंतर, पावणे आठच्या सुमारास कोस्टल रोड वरळी सी लिंक नॉर्थ बॉण्ड पोल नंबर ८० कडे गाडी थांबून बाहेर उतरला. गाडीचा इंडिकेटर चालूच होता. दोन मिनिटे थांबला. त्यानंतर मोबाईल गाडीत ठेवून समुद्रात उडी घेतली. बाजूने जाणाऱ्या चालकांनी याबाबत तात्काळ वाहतूक पोलिसांना कळवले. 

घटनेची वर्दी लागताच वाहतूक पोलिसांसह वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सागरी बोटीने शोध घेतला. मात्र ओहटी असल्याने त्याचा शोध घेण्यास अडचणी आल्या. बुधवारी सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन दरम्यान सातच्या सुमारास सी लिंक लँडिंग पॉईंट ब्रीज खाली एक जण तरंगताना दिसून आला. अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित केले. तो मृतदेह दर्शितचाच असल्याचे स्पष्ट होताच कुटुंबीयांना धक्का बसला. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करत वरळी पोलीस तपास करत आहे.

आत्महत्येमागचे गूढ कायम...
घटनास्थळावरून सुसाईड नोट मिळालेली नाही. तसेच नातेवाईकांकडूनही कुठलाही संशय वर्तविण्यात आलेला नाही. तरुणाचा मृतदेहही ताब्यात घेतला आहे.  आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे.
- रवींद्र काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरळी पोलिस ठाणे

Web Title: 30 year old man dies by suicide after jumping into sea from coastal road sea link connector in worli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.