३०० एसी लोकल... खरंच शक्य आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 08:26 AM2024-09-23T08:26:30+5:302024-09-23T08:27:37+5:30
रेल्वेमंत्र्यांनी लोकल प्रवास केला आणि मुंबईकरांना थंडगार लोकल प्रवासाचं स्वप्न दाखवलं.
सिद्धार्थ ताराबाई
मुख्य उपसंपादक
मुंबईकरांच्या लाडक्या लोकलच्या सर्व फेऱ्या वातानुकूलित झाल्या आहेत. पूर्वी गर्दीत गुदमरत, घामाने निथळत किंवा दरवाजात लटकत प्रवास करणाऱ्यांच्या जीवाला थोडा थंडावा मिळत आहे. त्यासाठी त्यांना तिकिटाचे किंवा पासचे जास्त पैसे मोजावे लागत नाहीत. 'त्याच भाड्यात थंड हवा खात प्रवास' हे त्यांचं स्वप्न साक्षात साकार झालं आहे, पण सर्व लोकलसेवा एसी केल्यामुळे गर्दी कमी झालीय का? तर नाही. किंबहुना ती वाढतेच आहे. आता गर्दीत जीव गुदमरतो का? हो पण आणि नाही पण, कारण, गर्दीत श्वास कॉडत असला, तरी थोडी थंड हवा खाता येते. लटकत प्रवास करावा लागत नाही, म्हणून पडून जीव गमावण्याचा धोका मात्र कमी झाला आहे. म्हणजेच, प्रवासातल्या रामभरोसेपणाची जोखीम कमी झाली आहे. त्यामुळे समस्त मुंबईकर सांप्रत सरकारला धन्यवाद देत आहेत. हे चित्र कदाचित आणखी काही वर्षांनी कागदावर उतरू शकतं, पण ते आताच रेखाटून पाहण्याचे प्रयोजन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच केलेला मुंबई दौरा.
रेल्वेमंत्र्यांनी लोकल प्रवास केला आणि मुंबईकरांना थंडगार लोकल प्रवासाचं स्वप्न दाखवलं. त्याचा आशय असा ३०० एसी लोकलसेवा सुरू करण्याची सरकारची इच्छा आहे, परंतु त्यात राजकीय अडथळा आहे. मुंबईकरांनी इच्छाशक्ती दाखवली, तर अशक्य ते शक्य करील सरकार. यावर मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटियन म्हणतात, 'मुंबईकरांची इच्छा अशी आहे की, सरकारी शक्ती सध्याच्या साध्या लोकलसेवा सुरळीत चालवण्यासाठी खर्च व्हावी. दोन गाड्यांतील वेळ दोन मिनिटांवर आणावी. वाढत्या गर्दीचे काय करायचं ते पाहावं. इलेव्हेटेड कॉरिडॉरचा पर्याय गंभीरपणे घ्यावा. लटकत प्रवास करावा लागणार नाही, प्रवासात प्राण कंठाशी येणार नाही, याची हमी द्यावी. शिवाय, सध्याच्या एसी लोकल फायद्यात चालवून दाखवाव्यात, मग खुशाल ३०० एसी लोकलसेवा आणाव्यात.' संतापून, कावून रेल्वेच्या नावे बोटं मोडणाऱ्या प्रवासी संघटना, प्रवासी यांना लोकल चालवण्यातलं तांत्रिक आणि प्रशासकीय ज्ञान नाही. मग, त्यांची क्षुल्लक अपेक्षा काय, तर प्रवास सुखकर नव्हे, तर त्यातल्या त्यात सुसह्य व्हावा, म्हणजे काय तर सध्याच्या लोकलसेवा वेळत का चालत नाहीत, ते शोधा. मेल-एक्स्प्रेसगाड्यांमुळे लोकल लेट सुटतात, लेट धावतात, हे मान्य करा. याचा अर्थ असा की प्रश्न आहे हे मान्य करा, ते मान्य केलंत तरच त्याचं उत्तर शोधता येईल. ३०० एसी लोकल चालवण्याची भानगड अंगाशी लावून घेणं, हे आजच्या लोकलप्रश्नाचं उत्तर कसं असेल?
तीनशेच का, ६०० एसी लोकलसेवा चालवा. व्यवहार्य आहे का ते तपासून संपूर्ण लोकलसेवा एसी करा, पण प्रवासभाडे सामान्य मुंबईकर आणि महामुंबईकरांना परवडणारे ठेवा. प्रवाशांची ही मागणी अगदी रास्तच. पण, त्याहीपेक्षा प्रवासी संघाचे कोटियन मूलभूत प्रश्न उपस्थित करतात, '३०० एसी लोकलसेवा सुरू करा, अशी मागणी कुणी केली होती का? मग मागणी नसताना पुरवठ्याचा मारा कशासाठी?" मागणी नसताना निवडणुकीवर डोळा ठेवून लाडक्या जनतेसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या जातात, त्याच जातकुळीतली ही 'माझी लाडकी एसी लोकल' नाही ना, असा प्रश्न पडू शकतो.