कफ परेडमध्ये ३०० एकरवर उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 03:38 AM2018-05-25T03:38:09+5:302018-05-25T03:38:09+5:30
न्यू यॉर्क शहरातील सेंट्रल पार्कच्या धर्तीवर कफ परेड येथे समुद्रात भराव टाकून उद्यान साकार होणार आहे.
मुंबई : कफ परेड येथे समुद्रात भराव टाकून भव्य उद्यान तयार करण्यात येणार आहे. तीनशे एकर जागेवर तयार होणाऱ्या या उद्यानाला विरोध होत होता. मात्र मुंबईच्या पुढील २० वर्षांच्या विकास आराखड्यात या उद्यानासाठी तरतूद करून या आरक्षणास मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे जलमार्ग, सुशोभित रस्ते आणि जेट्टीसह अत्याधुनिक सुविधा असणारे हे भव्य उद्यान कफ परेड बॅकबे रेक्लमेशनजवळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यू यॉर्क शहरातील सेंट्रल पार्कच्या धर्तीवर कफ परेड येथे समुद्रात भराव टाकून उद्यान साकार होणार आहे. हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. समुद्रात भराव टाकण्यासाठी मुंबई मेट्रोकरिता खोदण्यात येणाºया भुयारांमधून निघणाºया मातीसह इतर प्रकल्पांमधून येणारी माती व मुरुम यासाठी वापरले जाणार आहे. याबाबत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (नीरी) व राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने तयार केलेल्या मूल्यमापन अहवालाचा अभ्यास करून अंमलबजावणी करणे आणि निविदेचा मसुदा तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती.
पर्यावरण क्षेत्रातील जाणकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध होता. मात्र विकास आराखड्यात या प्रकल्पासाठी विशेष आरक्षण ठेवण्यात आले आहे. या कामासाठी ‘मे टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स लि.’ यांची निविदा योग्य ठरणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. स्थायी समिती व महापालिकेची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर कार्यादेश देण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती संबंधित खात्याच्या अधिकाºयाने दिली. प्राप्त झालेल्या या निविदेचा खर्च ३ कोटी ८७ लाख रुपये आहे.
असे असेल सल्लागाराचे काम
या उद्यानासाठी नेमण्यात येणाºया सल्लागाराला विस्तृत प्रकल्प अहवाल व प्रकल्पाचा वास्तविकता अहवाल सादर करावा लागणार आहे. याशिवाय संबंधित संस्थेला निविदेचा मसुदाही तयार करावा लागेल.
या कामासाठी लागणाºया विविध परवानग्या, परवाने मिळविण्यासाठी मदत करणे, प्रकल्पाच्या विकासासाठी पर्याय सुचवणे आणि थ्रीडी इमेज तयार करणे अशी कामे करावी लागणार आहेत. या प्रकल्पाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याची जबाबदारीही सल्लागाराची असणार आहे.
वाहतुकीचे नियोजन, सुरक्षेला प्राधान्य
ही जागा विकसित झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्दळ निर्माण होणार आहे. त्यामुळे या जागेवरील वाहतूक व्यवस्थापन, पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापनासह महत्त्वपूर्ण असणाºया सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत सल्लागाराला अभ्यास करून नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश असलेला अहवाल सादर करावा लागेल. याशिवाय ई-निविदा, वास्तुशास्त्रीय आराखडे, देयकांबाबतही नियोजन सल्लागाराला सुचवावे लागेल.