300 विमान प्रवाशांची दहा तास लटकंती; मुंबई विमानतळावरील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 06:57 AM2023-05-27T06:57:48+5:302023-05-27T06:58:01+5:30
धक्कादायक बाब म्हणजे रात्री अकरा ते सकाळी सात या वेळेत प्रवासी विमानातच बसून होते. या कालावधीत त्यांना अन्न वा पाणीही देण्यात आले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रात्री साडे अकराच्या सुमारास विमान हवेत झेपावणे अपेक्षित असताना सकाळी सातपर्यंत ते तसेच उभे करून ठेवल्याने तब्बल ३०० प्रवाशांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले. हा धक्कादायक प्रकार घडला मुंबई विमानतळावर. धक्कादायक बाब म्हणजे रात्री अकरा ते सकाळी सात या वेळेत प्रवासी विमानातच बसून होते. या कालावधीत त्यांना अन्न वा पाणीही देण्यात आले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिएतनामचे व्हिएतजेट हे विमान गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हो-ची-मिन्ह शहराकडे झेपावणे अपेक्षित होते. त्यानुसार रात्री अकरा वाजता सर्व प्रवासी स्थानापन्न झाले. मात्र, साडेबारा वाजले तरी विमान जागचे हलेना. त्यामुळे प्रवाशांमध्ये चुळबुळ सुरू झाली. विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करण्यात आले. थोड्या वेळाने विमानातील वातानुकूलन यंत्रणाही बंद झाले. अशा अवस्थेत तब्बल दहा तास प्रवाशांना काढावे लागले.
क्रू मेंबर्सकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने प्रवाशांची चीडचीड वाढली. त्यानंतर सकाळी सात वाजता सर्व प्रवाशांना विमानतळावर इमिग्रेशन विभागापाशी नेण्यात आले. मात्र, रात्री अकरा ते सकाळी सात या वेळात पूर्णवेळ विमानात बसून असलेल्या प्रवाशांना अन्न किंवा पाणीदेखील देण्यात आले नाही. अनेक प्रवाशांनी आपल्या संतापाला सोशल मीडिया खात्यावरून वाट मोकळी करून दिली.
नियम काय सांगतो?
nनागरी विमान महासंचालनालयाच्या (डीजीएसीए) नियमांनुसार, अशा पद्धतीने विमानाला विलंब झाल्यास संबंधित प्रवाशांच्या खान-पानाची तसेच सर्व अनुषंगिक व्यवस्था करण्याची जबाबदारी विमान कंपनीची असते.
nमात्र, अशी कोणताही सेवा विमान कंपनीने दिली नसल्याचा दावा प्रवाशांनी केला. तर कंपनीच्या धोरणानुसार प्रवाशांच्या वैयक्तिक विनंतीवर त्यांना सेवा पुरविण्यात आल्या होत्या, असा दावा संबंधित विमान कंपनीने केला आहे.