वरळी रेसकोर्स येथे उभे राहणार ३०० खाटांचे विलगिकरण केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 06:54 PM2020-05-13T18:54:51+5:302020-05-13T18:56:18+5:30
कोरोना उपायोजनांचा अस्लम शेख व आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
मुंबई : 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्यविषयक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख व मुंबई उपनगरचे पालकमंत्री व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी एनएससीआय वरळी डोम येथील पाचशे खाटांच्या विलगीकरण कक्षास तसेच मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वांद्रे कुर्ला संकुल येथे उभ्या राहत असलेल्या एक हजार खाटांच्या कोविड रुग्णालयास व वरळी रेस कोर्सवर उभ्या राहत असलेल्या अलगिकरण कक्षास भेट देऊन पाहणी केली.या आढावा दौऱ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त इक्बाल सिंग चहल हे देखील उपस्थित होते.
अस्लम शेख यांनी सांगितले की, वांद्रे- कुर्ला संकुल येथे उभ्या राहिलेल्या एक हजार खाटांच्या कोविड रुग्णालय व एनएससीआय डोम येथील विलगिकरण कक्षाच्या धर्तीवर वरळी रेस कोर्सवर देखील तीनशे खाटांच्या विलगिकरण केंद्राची उभारणीही करण्यात येत आहे.एन.एस.सी.आय. परिसरात लवकरच ४० खाटांचा कोविड - समर्पित १९ अतिदक्षता विभाग देखील सुरु होणार आहे.अलगिकरण कक्ष व मॉड्युलर रुग्णालये यांच्या माध्यमातून कोरोना महामारीला आटोक्यात कसं आणता येईल या अनुशंगाने पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याशी विस्तृत चर्चा करण्यात आली असल्याचे अस्लम शेख यांनी शेवटी सांगितले.