मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या अडचणी आणखी वाढत आहेत. पैशांअभावी गेली काही वर्षे नवीन बस घेऊ न शकलेल्या बेस्टने वयोमर्यादा संपलेल्या तीनशे बसगाड्या भंगारात काढल्या आहेत. परंतु या गाड्यांचे खरेदीदारच अद्याप सापडले नाहीत. त्यामुळे नवीन बस खरेदी रखडली असून बस स्टॉपवर प्रवाशांची प्रतीक्षा मात्र वाढली आहे. बेस्टच्या ताफ्यात सुमारे चार हजार बस आहेत. मात्र यापैकी निम्म्याहून अधिक बसगाड्यांची वयोमर्यादा संपली आहे. त्यामुळे वारंवार या बस बंद पडत आहेत. त्यामुळे देखभालीवर प्रचंड खर्च येतो. अशा तीनशे बस बदलण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार डिसेंबरमध्ये या बस खरेदी करण्यात येणार आहेत. मात्र भंगारात काढूनही या बसगाड्यांना कोणी वाली सापडलेला नाही. नवीन बस खरेदीसाठी बेस्टला नऊ कोटी रुपयांची गरज आहे. या बस भंगारात काढून ही रक्कम उभी राहील, असे अपेक्षित होते. मात्र १५ वर्षांहून जुन्या असलेल्या या बस खरेदी करण्यासाठी कोणी पुढे आलेले नाही. त्यात पावसात भिजून या बस गंजल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गाड्यांचा लिलाव करण्याची मागणी बेस्ट प्रशासनाकडे बेस्ट समिती सदस्याने केली आहे. (प्रतिनिधी)
बेस्टच्या ३०० बस भंगारात
By admin | Published: October 13, 2016 4:29 AM