कल्याण-डोंबिवलीत बसविणार ३०० सीसीटीव्ही कॅमेरे
By admin | Published: January 23, 2016 11:25 PM2016-01-23T23:25:44+5:302016-01-23T23:25:44+5:30
कल्याण-डोंबिवलीतील प्रमुख चौकांत आणि रस्त्यांवर ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव कल्याण-डोंबिवली महापालिकेला सादर करण्यात आला आहे. कॅमेरे बसविण्याचे काम
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील प्रमुख चौकांत आणि रस्त्यांवर ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव कल्याण-डोंबिवली महापालिकेला सादर करण्यात आला आहे. कॅमेरे बसविण्याचे काम महापालिकेतर्फे केले जाणार आहे. योजनेला मंजुरी मिळताच येत्या सहा महिन्यात ही योजना प्रत्यक्षात येईल, अशी माहिती वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली.
वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वात मोठा आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे ३०० सीसीटीव्हीची मागणी करण्यात आली. त्याच्या सहाय्याने नंबर प्लेट रेकॉड ठेवले जाईल. तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पकडणे सोईचे होईल. शिवाय कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यास मदत होईल. सीसीटीव्हीची डिजिटल कंट्रोल रुम उपायुक्त कार्यालयात किंवा वाहतूक नियंत्रण शाखेच्या मुख्य कार्यालयात असेल, तर त्याचे मॉनिटरिंग करणे सोपे होईल, अशी भूमिका मांडल्याचे त्या म्हणाल्या. ठाण्याच्या धर्तीवर कल्याणमध्येही तशी मॉनिटरिंग रुम असणे आवश्यक आहे. पालिकेने सीसीटीव्हीसोबत शहरातील सिग्नल यंत्रणा सुरु करावी, रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारुन घ्यावेत, अशा मागण्या वाहतूक पोलिसांनी केल्याचा तपशील करंदीकर यांनी दिला. महापालिकेने स्मार्ट सिटीसाठी जो प्रस्ताव तयार केला. त्यासाठी नागरिकांकडून सूचना मागविल्या होत्या. बहुतांश नागरिकांनी वाहतुक कोंडीचा प्रश्न उपस्थित तोच प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले होते.
नागरिकांना वाहतुकीचे प्रशिक्षण देणे, जनजागृती करण्याचा उद्देश या केंद्राद्वारे साध्य होऊ शकतो, असे उपायुक्त करंदीकर म्हणाल्या.
कल्याणमधील रस्ते प्रशस्त नाहीत. अनेक ठिकाणी रस्ते विकासाची कामे सुरु असल्याने कोंडी होते. कल्याण खाडी पुलावर नवा उड्डाणपूल तयार होणार आहे. मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली हा खाडीपूल तयार होणार आहे. तसेच गोविंदवाडी बायपास खुला होणार आहे. त्यामुळे कोंडंी दूर होण्यास मदत होईल. कल्याण-डोंबिवलीत आरटीओ आणि वाहतूक नियंत्रण पोलिस संयुक्तपणे महिनाअखेरीस मोहीम हाती घेणार आहेत. ठाणे आयुक्त कार्यालयात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गेल्या वर्षांत एक लाख २२ हजार केसेस केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)