मुंबई : आधीपासूनच तोट्यात असताना कोरोना महामारीच्या काळात चाक पूर्णपणे खड्ड्यात रुतून बसलेल्या राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) राज्य सरकारने बूस्टर दिले आहे. कर्मचाऱ्यांचे डिसेंबर व जानेवारी महिन्याचे वेतन भागविण्यासाठी ३०० कोटींचे विशेष अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ हजार कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने हा निधी वर्ग करण्यात आला आहे, असे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. कोविड-१९च्या महामारीमुळे टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे बहुतांश एसटी बंद राहिल्याने महामंडळाच्या उत्पनात मोठ्या प्रमाणात घट झाली. रक्कम नसल्याने कर्मचाऱ्याचे वेतन थकले होते. त्यामुळे राज्य सरकारने १४ डिसेंबरला महामंडळाला १ हजार कोटींचे विशेष अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला.
नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीसाठी प्रतिमहिना १५० कोटीप्रमाणे हा निधी दिला जाणार आहे, त्यानुसार आतापर्यंत १५० कोटी देण्यात आले आहेत. तर गेल्या वर्षीच्या डिसेंबर व या वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या वेतनासाठी प्रत्येकी १५० कोटीप्रमाणे एकूण ३०० कोटी नुकतेच सरकारकडून वितरित करण्यात आले आहेत.