मुंबई : राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रतिशेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी एवढा निधी ऑनलाइन वितरित होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
१० कोटींपेक्षा जास्त मागणी१० कोटींपेक्षा जास्त मागणी असलेले नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यांतील पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजारांपर्यंत अनुदान जमा होईल. ज्या लाभार्थींचे देयक १० हजार रुपयांपेक्षा जास्त आहेत त्यांनाही पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजार रुपये अनुदान मिळेल.