पालिकेचे ३०० अभियंते पदोन्नतीपासून वंचित, प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 11:21 IST2025-01-23T11:20:36+5:302025-01-23T11:21:55+5:30
महापालिकेतील कनिष्ठ अभियंते ते कार्यकारी अभियंत्यांपर्यंतचे अनेक अभियंते आजही पदोन्नतीपासून वंचित आहेत. मागील काही महिन्यांपासून पदोन्नतीसाठी पात्र ठरूनही महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही होत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

पालिकेचे ३०० अभियंते पदोन्नतीपासून वंचित, प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याची तक्रार
मुंबई - महापालिकेतील कनिष्ठ अभियंते ते कार्यकारी अभियंत्यांपर्यंतचे अनेक अभियंते आजही पदोन्नतीपासून वंचित आहेत. मागील काही महिन्यांपासून पदोन्नतीसाठी पात्र ठरूनही महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही होत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. त्यामुळे सर्व प्रवर्गातील २५० ते ३०० अभियंत्यांची पदे रिक्त आहेत.
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहायक अभियंता आणि कार्यकारी अभियंता पदावरील अभियंते पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. तर, दुसरीकडे पदे रिक्त असल्याने अभियंत्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्याचा परिणाम अनेक विकासकामांवर होत आहे.
महापालिकेतील या सर्व अभियंत्यांना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पदोन्नती मिळणे आवश्यक होते. मात्र,
लोकसभा आणि त्यापोठापाठ विधानसभा निवडणूकही झाली; परंतु पदोन्नतीच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याचे दिसत नाही. परिणामी त्यांची पदोन्नती राखडली आहे.
...यामुळे पुढे होतो गोंधळ
अभियंत्याच्या पदोन्नतीची माहिती नगर अभियंता विभागाला असते. जेव्हा नियुक्ती होते, तेव्हाच यादी ठरली जाते. त्यामुळे नियुक्तीनुसार जर पदोन्नती दिल्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही, असे मत बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनियर्स युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी व्यक्त केले.
नगर अभियंता विभाग १०० ते २०० पदे रिक्त झाल्यानंतर पदोन्नतीसाठी प्रयत्न करतात, त्यातून मग पुढे गोंधळ होतो. या विभागावर कोणाचाही अंकुश नसल्याने असे प्रकार होतात, असे ते म्हणाले.
५०% पदे अंतर्गत बढतीतून
यासंदर्भात नगर अभियंता विभागात संपर्क साधला असता, कनिष्ठ अभियंत्यांची पदे भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. सहायक अभियंता पदावरील ५० टक्के पदे अंतर्गत अभियंत्यांच्या पदोन्नतीमधून आणि उर्वरित ५० टक्के बाहेरून भरली जातील. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे, असे सांगण्यात आले.