मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी ‘मेघा श्रेय’ या संस्थेच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून ३०० प्रथमोपचार पेट्या देण्यात आल्या आहेत. महानगरपालिका मुख्यालयात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांची आज भेट घेऊन ‘मेघा श्रेय’ या संस्थेच्या संस्थापक सीमा सिंग यांनी या प्रथमोपचार पेट्या सुपूर्द केल्या. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी माहिती दिली की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून विविध उपक्रम उद्यानांमध्ये राबविले जातात. उद्यानांमध्ये येणाऱ्या नागरिकांना अथवा मुलांना क्वचितप्रसंगी दुखापत झाल्यास त्यांना प्राथमिक उपचार तात्काळ उपलब्ध व्हावेत, या हेतूने ‘मेघा श्रेय’ संस्थेने उद्यान विभागाला प्रथमोपचार पेट्या (First Aid Kits) प्रदान केल्या आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे नागरिकांना जास्तीत-जास्त सोयी-सुविधा देण्यासाठी महानगरपालिका आणि सामुदायिक सामाजिक दायित्व (CSR) च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने मुंबईतील उद्याने / मैदाने / वाहतूक बेटे / रस्ता दुभाजक / पट्टी उद्याने इत्यादींचे सुशोभिकरण व मियावाकी पद्धतीने ४ लाखांपेक्षा अधिक देशी प्रजातींची वृक्ष लागवड केलेले वनीकरण यांचा समावेश आहे. सामुदायिक सामाजिक दायित्व (CSR) व दानशूर व्यक्तिंच्या मदतीने विरंगुळा आणि सोयी-सुविधांच्याही पलीकडे जाऊन संगीतमय सकाळ, राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र (NCPA) च्या सहकार्याने संगीतमय संध्या, मुंबईतील २४ विभागातील उद्यानांमध्ये मोफत वाचनालय अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत, असे परदेशी यांनी नमूद केले.