३०० जुगाऱ्यांना अटक
By admin | Published: April 22, 2015 10:57 PM2015-04-22T22:57:51+5:302015-04-22T22:57:51+5:30
पश्चिम भागातील रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सायकल स्टॅण्डच्या मागील ‘संगम चॅरिटेबल ट्रस्ट’ या जुगाराच्या क्लबवर विशेष शाखेच्या
जितेंद्र कालेकर, ठाणे
पश्चिम भागातील रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सायकल स्टॅण्डच्या मागील ‘संगम चॅरिटेबल ट्रस्ट’ या जुगाराच्या क्लबवर विशेष शाखेच्या पथकाने सोमवारी धाड टाकून सुमारे ३०० जुगाऱ्यांची धरपकड केली. या कारवाईत जुगाराच्या सामग्रीसह सुमारे दोन लाखांची रोकडही जप्त करण्यात आल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिली.
या क्लबमध्ये प्लास्टिकचे कॉइन देऊन २१ पानांचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी धाड टाकली. ‘सुदामा प्लाझा’ आणि ‘कृष्णा प्लाझा’ या तीन मजली इमारतींमधील वातानुकूलित अड्ड्यांवर २५ जणांच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत हे धाडसत्र राबविले. त्यासाठी नौपाडा, विशेष शाखा आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे ७० कर्मचारी रात्री १२ पर्यंत पंचनामे करण्याचे काम करीत होते. या धाडसत्राने अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा क्लब येतो, त्या नौपाडा पोलिसांनाही या धाडीबाबत धाडसत्र सुरू असेपर्यंत कोणतीच माहिती नव्हती. चॅरिटेबल ट्रस्टचा परवाना देणाऱ्या धर्मादाय आयुक्तांनीही या क्लबमध्ये नेमका कोणता ‘उद्योग’ चालतो, याची खातरजमा करण्याची गरज असल्याचेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.