कोरोनाकाळात मानसिक समस्यांमध्ये ३०० टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:05 AM2020-12-25T04:05:52+5:302020-12-25T04:05:52+5:30
टेलिमेडिसीन सोसायटी ऑफ इंडियाचा अहवाल स्नेहा मोरे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : यंदाच्या वर्षात कोरोना संसर्गामुळे अचानक जाहीर झालेल्या ...
टेलिमेडिसीन सोसायटी ऑफ इंडियाचा अहवाल
स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदाच्या वर्षात कोरोना संसर्गामुळे अचानक जाहीर झालेल्या लाॅकडाऊनचा सर्वसामान्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. टेलिमेडिसीन सोसायटी ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या काळात मानसिक आरोग्याच्या तक्रारींविषयी मार्गदर्शन घेण्याचे प्रमाण एकूण ३०० टक्क्यांनी वाढले. यात महिलांचे प्रमाण ३३ टक्के आहे. मानसिक स्वास्थ्याशी निगडित चिंता, नैराश्य, ताण, पॅनिक अटॅक आणि बायोपोलार डिसऑर्डर अशा समस्यांविषयी अधिक विचारणा झाली आहे.
गेल्या वर्षाच्या अहवालानुसार, महिला-पुरुषांचे टेलिमेडिसीन वापराचे प्रमाण ७५-२५ असे होते, यंदा हे प्रमाण ६८-३२ टक्क्यांवर पोहोचले आहे. लाॅकडाऊनच्या काळात मानसिक स्वास्थ्याविषयी सर्वसामान्य काहीसे जागरूक झाल्याचे दिसून आले. मुख्यतः लाॅकडाऊनच्या काळात ऑनलाइन मानसिक स्वास्थ्याविषयी सल्लामसलत घेण्याचे प्रमाण वाढले, त्यातही एरव्ही कधीही आपल्या आरोग्याला महत्त्व न देणाऱ्या महिला यात अग्रक्रमी असल्याचे दिसून आले आहे.
अहवालातील निरीक्षणानुसार, वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच ऑनलाइन स्वरूपात कन्सल्टेशन करण्याकडे सर्वाधिक कल वाढला आहे. २६ टक्के सामान्यांनी जनरल फिजिशियन, २० टक्के व्यक्तींनी त्वचाविकारतज्ज्ञ, १६ टक्के व्यक्तींनी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि अन्य प्रत्येकी सात टक्के व्यक्तींनी कान, नाक, घसा, बालरोगतज्ज्ञ या शाखा तज्ज्ञांकडून सल्ला, औषधोपचार घेतले.
राष्ट्रीय स्तराचा विचार केला असता, चेन्नईत सर्वाधिक व्यक्तींनी टेलिमेडिसीनचा वापर केला. त्यानंतर बंगळुरू, दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांतील टेलिमेडिसीनचे प्रमाण मागच्या वर्षाच्या तुलनेत ३०० टक्क्यांनी वाढलेले दिसून आले.
अहवालानुसार, न्यूरोसर्जन, हृदयविकारतज्ज्ञ आणि ऑन्कोलाॅजिस्ट अशा विविध तज्ज्ञांकडील शारीरिक तक्रारींविषयीचा ओघ ३२ टक्क्यांनी कमी झाल्याचे निरीक्षण मांडले आहे.
* ज्येष्ठ नागरिकही तंत्रज्ञानस्नेही
यंदाच्या वर्षात ज्येष्ठ नागरिकही तंत्रज्ञानस्नेही झालेले दिसून आले. अहवालानुसार, ५० वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्तींनीही टेलिमेडिसीनला पसंती दर्शविली आहे. टेलिमेडिसीनच्या एकूण प्रमाणात हे प्रमाण १२ टक्के आहे. गेल्या वर्षी ते ५ टक्के होते.
..............................