परदेशी नोकरीचे आमिष दाखवून ३०० जणांना गंडा

By admin | Published: January 20, 2015 01:20 AM2015-01-20T01:20:17+5:302015-01-20T01:20:17+5:30

परदेशी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुमारे ३०० जणांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार वाशी येथे घडला आहे.

300 people have been bribed for foreign jobs | परदेशी नोकरीचे आमिष दाखवून ३०० जणांना गंडा

परदेशी नोकरीचे आमिष दाखवून ३०० जणांना गंडा

Next

नवी मुंबई : परदेशी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुमारे ३०० जणांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार वाशी येथे घडला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांनी कार्यालय बंद करून पळ काढला आहे.
वाशी येथील नीलकंठ ओव्हरसीज कंपनीने प्रसारमाध्यमांमधून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करून नागरिकांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवले होते. या जाहिरातीला भुलून परदेशात नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांनी वाशी येथील कार्यालयात संपर्क साधला होता. यावेळी त्यांच्याकडून आवश्यकतेनुसार प्रत्येकी ५० हजार ते १ लाख रुपये आगाऊ घेण्यात आले. ही रक्कम घेतल्यानंतर काही दिवसातच कॅनडा, आॅस्ट्रेलिया तसेच इतर देशांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष त्यांना दाखवण्यात आले होते. परंतु सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही नोकरी लागत नसल्याने अनेक जण कंपनीचे मालक अशोक मेहता यांना संपर्क केला. मात्र वेळोवेळी त्यांना मेहता याच्याकडून केवळ आश्वासन मिळत होते. अखेर काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रत्येकाला नोकरी लागल्याची हमी दिली. तर मेहता व त्याचे सहकारी गौरव सोमाणी यांच्या सांगण्यावरून विदेशात जाण्याच्या तयारीसाठी अनेकांनी सध्याची नोकरी सोडली आहे. काही विवाहित दाम्पत्य देखील विदेशात नोकरीसाठी पैसे भरून फसलेले आहेत.
गेले दोन दिवस मेहता व त्याच्या सहकाऱ्यांचा कसलाही संपर्क होत नसल्याने सोमवारी काही जण वाशी येथील कार्यालयात गेले. यावेळी कार्यालयाला लागलेला टाळा पाहताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

कॅनडा येथे नोकरीसाठी जाहिरात वाचल्याने सदर कंपनीकडे ५० हजार रुपये भरले होते. त्यानुसार काही दिवसांपूर्वी आपल्याला कॅनडात नोकरी लागल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार आपण भाडोत्री राहत असलेल्या घराचा करार रद्द करुन सध्याची नोकरी देखील सोडलेली आहे.
- पवन धारीवाल, तक्रारदार

आॅस्ट्रेलिया येथे पती - पत्नीला नोकरी लागल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार दोघांनीही विदेशात नोकरीला जाण्याची तयारी केली. शिवाय सध्याची नोकरी देखील दोघांनी सोडली आहे. अशातच ऐन वेळी कार्यालय गुंडाळून पळ काढल्याने दोघांवरही बेरोजगारीचे संकट कोसळले आहे.
- अमित मेहता, तक्रारदार

Web Title: 300 people have been bribed for foreign jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.