बनावट विमान तिकिटे देऊन ३०० भाविकांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 04:19 AM2018-12-31T04:19:54+5:302018-12-31T04:20:12+5:30
जगन्नाथ यात्रेसह विविध ठिकाणी ग्रुपने यात्रेला निघालेल्या मुंबईतील अडीचशे ते तीनशे भाविकांना बनावट तिकिटे देऊन त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार दादरमध्ये उघडकीस आला आहे.
मुंबई : जगन्नाथ यात्रेसह विविध ठिकाणी ग्रुपने यात्रेला निघालेल्या मुंबईतील अडीचशे ते तीनशे भाविकांना बनावट तिकिटे देऊन त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार दादरमध्ये उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीच्या या ठगाने मुंबईसह ठाणे, दिल्लीतील हजारहून अधिक नागरिकांना अशा प्रकारे गंडा घातल्याचे समोर आले आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुरुवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
दादर परिसरात राहणारे कमलेश पाटील (४२) हे इंडियन एअरलाइन्स येथे व्हॉइस कम्युनिकेशनचे काम करतात. ते गिरगाव येथील श्री श्री राधागोपीनाथ मंदिराचे सेवक आहेत. गेल्या वर्षी जगन्नाथ यात्रेसाठी मित्राने दिल्लीतील कमल खन्ना याच्या चैतन्य ट्रॅव्हल्सकडून विमान तिकीट खरेदी केले. त्यांच्या मेव्हण्यालाही तिकीट हवे असल्याने त्यांनी तिकिटावरील कमल खन्नाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र तिकीट उपलब्ध नसल्याने पाटील कुटुंबीय जगन्नाथ यात्रेला गेले. आठवडाभरानंतर पाटील हे यात्रेवरून परतले तेव्हा, कमल खन्नाने त्यांच्याकडे ग्रुप बुकिंगसाठी हट्ट धरला. बुकिंग केल्यास जास्तीचे कमिशन देण्याचे आमिष दाखविले.
सुरुवातीला मे २०१८ मध्ये पाटील यांनी मंदिरातील ४० सेवकांना ६ नोव्हेंबरच्या जगन्नाथ यात्रेसाठी मुंबई ते भुवनेश्वर तिकिटाची बुकिंग कमल खन्नाला दिली. प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे दोन लाख रुपये त्याच्या खात्यात जमा केले. त्यामुळे पाटील यांचा त्याच्यावर विश्वास बसला.
त्याने याबाबत मित्र महेश गणपत नाटुस्करला सांगितले. दोघांनी खन्नाला अडीचशे ते तीनशे तिकिटांच्या बुकिंग दिल्या. मार्च २०१८ ते २७ डिसेंबरपर्यंत त्यांनी खन्नाला २२ लाख २० हजार ५७६ रुपये दिले. मात्र, प्रवासाची वेळ आली तेव्हा खन्नाने पाठविलेले तिकीट बनावट असल्याचे समजले आणि भाविकांना धक्का बसला. त्यातच खन्नाने अनेक भाविकांचे तिकीटही रद्द केल्याने काही जण गेलेल्या ठिकाणी अडकले.
पाटील यांनी खन्नाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो नॉट रिचेबल होता. अखेर त्यांनी गुरुवारी शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी खन्नाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तो दिल्लीचा रहिवासी आहे.
ठाण्यातून अटक
खन्नाने ठाण्यातही शेकडो जणांची फसवणूक केली. या गुन्ह्यात नुकतीच मीरा रोड पोलिसांनी त्याला अटक केली. तपासात त्याच्याविरुद्ध दिल्लीतही गुन्हा दाखल असल्याचे समजले. तेथेही साडेतीनशे भाविकांना त्याने गंडा घातला. शिवाजी पार्क पोलीस लवकरच त्याचा ताबा घेतील.
मुंबईच असुरक्षित
खन्नाने दिलेल्या तिकिटाने प्रवाशांनी विमानतळावर प्रवेश मिळवला. मात्र पुढे बोर्डिंगदरम्यान तिकिटे बनावट असल्याचे समजले. त्यामुळे पुढे अशा तिकिटांच्या आधारे एखादा अतिरेकीही सहज विमानतळावर प्रवेश मिळवू शकतो, हीदेखील तितकीच चिंतेची बाब आहे. त्यामुळे मुंबई असुरक्षित असल्याचे तक्रारदार कमलेश पाटील यांनी सांगितले.